'अच्छे दिन'ला काँग्रेसची श्रद्धांजली

By Admin | Updated: June 1, 2016 00:37 IST2016-06-01T00:37:20+5:302016-06-01T00:37:20+5:30

सामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून भारतीय जनता पक्षाने सत्तेची पोळी भाजली.

Congress's tribute to 'good day' | 'अच्छे दिन'ला काँग्रेसची श्रद्धांजली

'अच्छे दिन'ला काँग्रेसची श्रद्धांजली

बबलू देशमुखांच्या नेतृत्वात आंदोलन : जिल्हा काँग्रेसची आक्रमक घोषणाबाजी, कलेक्ट्रेट दणाणले
अमरावती : सामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून भारतीय जनता पक्षाने सत्तेची पोळी भाजली. परंतु भाजपचे हे स्वप्नरंजन केवळ स्वार्थापुरतेच होते. वास्तवात केंद्र शासनाने सत्ताप्राप्ती आधी आणि नंतर दिलेले एकही आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण झालेले नाही. त्यामुळे भाजप शासन जरी सत्तास्थापनेची द्विवर्षपूर्ती साजरी करीत असले तरी ही सामान्य जनतेची शुध्द फसवणूक आहे. त्यामुळेच केंद्र शासनाच्या ‘अच्छे दिन’ संकल्पनेला श्रध्दांजली अर्पण करून जिल्हा काँग्रेसने केंद्र शासनाचा प्रतिकात्मक निषेध नोंदविला. काँग्रेसजनांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने व घोषणाबाजी करून कलेक्ट्रेटचा परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी संबोधित करताना बबलू देशमुख म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच विदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा करण्याची घोषणा केली होती. पण, काळा पैसा परत आलाच नाही. दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधीक ५० टक्के नफा मिळालेलाच नाही. त्यामुळे मोदी शासनाच्या सर्व घोषणा वांझोट्या ठरल्या आहेत. काँग्रेस शासनाने सुरु केलेल्या सर्वसामान्यांशी निगडित योजनांमध्ये निधी कपात केल्याचा घणाघाती आरोपही देशमुख यांनी केला.

प्रवेशास मज्जाव, पोलिसांशी बाचाबाची
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी जिल्हा कचेरीत प्रवेश नाकारल्याने कार्यकर्त्यांची पोलिसांसमवेत बाचाबाची झाली. पोलिसांनी निवडक पदाधिकाऱ्यांनाच आत प्रवेश देण्याची भूमिका घेतल्याने कार्यकर्ते संतापले. शेवटी पोलिसांना न जुमानता काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशव्दार लोटून आत प्रवेश मिळविला. परिस्थिती हाताळताना पोलिसांची दमछाक झाली.

घोषणांनी दणाणला परिसर
मोदी सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे केंद्र शासनाच्या विरोधात दिलेल्या विविध घोषणा व नारेबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होेता. काँग्रेसजन प्रचंड आक्रमक झाले होते.

प्रवेशद्वारावर कांद्यांचा वर्षाव
भाजपने दुष्काळी परिस्थिीतीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. आता कांदा व भुईमूग उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. शासकीय खरेदीचा निर्णयदेखील शासन घेत नाही. त्यामुळे शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून कलेक्ट्रेटच्या प्रवेशद्वारावर कांद्यांचा वर्षाव करण्यात आला.

‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी
काँग्रेस पक्षाद्वारे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या ‘अच्छे दिन’ ची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. ‘अच्छे दिन’च्या फलकाला कांद्यांचा हार घालून हातात मेणबत्त्या घेऊन काँग्रेसजनांनी प्रतिकात्मक श्रध्दांजली वाहिली.

Web Title: Congress's tribute to 'good day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.