काँग्रेसची मुसंडी, २४ जागांवर विजय
By Admin | Updated: November 3, 2015 01:47 IST2015-11-03T01:47:32+5:302015-11-03T01:47:32+5:30
जिल्ह्यात नवनिर्मित चार नगरपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांत चुरशीच्या लढती झाल्यात.

काँग्रेसची मुसंडी, २४ जागांवर विजय
अमरावती : जिल्ह्यात नवनिर्मित चार नगरपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांत चुरशीच्या लढती झाल्यात. सोमवारी सकाळी मतमोजणीअंती तिवसा येथे यशोमती ठाकुरांच्या नेतृत्वात काँग्रेसचा दिमाखदार विजय झाला. नांदगाव खंडेश्वरला काँग्रेस व भाजपात निकराची झुंज झाली. येथे काँग्रेसला सत्तेची कवाडे उघडली. भातकुली येथे आ. रवी राणांची जादू चालली. येथे युवा स्वाभिमान अपक्षांच्या सहकार्याने सत्ता स्थापन होईल. धारणी येथे राष्ट्रवादीचे ८ सदस्य निवडून आले. या निवडणुकीत ६८ पैकी सर्वाधिक २४ जागांवर काँग्रसचे उमेदवार विजयी झालेत. शिवसेना ११, राष्ट्रवादी काँग्रेस १०, भाजप ८, अपक्ष ६ व भाकपला १ जागा मिळाली. एकूण जागांपैकी काँग्रेसच्या यशाचा वाटा ३५ टक्के इतका आहे.
आमदार ठाकुरांचा करिश्मा
तिवसा : नवनिर्मित तिवसा नगरपंचायतीवर मोहोर उमटविण्यासाठी सर्व पक्ष सरसावले असताना आ. यशोमती ठाकुरांच्या नेतृत्वात एका समर्थित अपक्षासह ११ जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी बहुमत प्राप्त केले. नगरपंचायत स्थापनेपूर्वी येथे मागील २५ वर्षे शिवसेनेची सत्ता होती.
धारणीत राष्ट्रवादी
धारणी : धारणी नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ८ जागांवर विजय मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले. राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत १७ पैकी ८ जागा पटकावल्यात. त्यापाठोपाठ भाजपला ४, काँग्रेसला ३ तर शिवसेनेला २ जागा मिळाल्यात.
भातकुलीत राणांचा झेंडा
अमरावती : भातकुली नगरपंचायतीमध्ये आ. रवी राणा प्रणित युवा स्वाभिमान संघटना सत्तेजवळ पोहोचली आहे. १७ सदस्यीय नगर पंचायतीत आ. राणा प्रणित महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेसला सर्वाधिक ८ जागा मिळाल्या. काँग्रेसला ४, तर शिवसेनेला ३ जागांवर समाधान मानावे लागले.
नांदगावमध्ये त्रिशंकू
नांदगाव खंडेश्वर : येथील नगर पंचायतीच्या १७ प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ७, भाजप ४, शिवसेना २, राष्ट्रवादी २, अपक्ष १ व युवास्वाभिमान समर्थित एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. या निवडणुुकीत प्रभाग क्र.१ मधून काँग्रेसच्या कल्पना अमोल मारोटकर विजयी झाल्यात.