जिल्हा परिषदेच्या विषय समितींवर काँग्रेसचे वर्चस्व
By Admin | Updated: October 1, 2014 23:15 IST2014-10-01T23:15:13+5:302014-10-01T23:15:13+5:30
जिल्हा परिषदेच्या चार विषय समितींसाठी बुधवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसने समाज कल्याण, बांधकाम व शिक्षण, कृषी आणि पशुसंवर्धन या तीन समितींवर बाजी मारली. तर महिला बालकल्याण

जिल्हा परिषदेच्या विषय समितींवर काँग्रेसचे वर्चस्व
निवडणूक : प्रथमच तीन महिला सभापती सांभाळणार धुरा
अमरावती : जिल्हा परिषदेच्या चार विषय समितींसाठी बुधवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसने समाज कल्याण, बांधकाम व शिक्षण, कृषी आणि पशुसंवर्धन या तीन समितींवर बाजी मारली. तर महिला बालकल्याण समितीवर राष्ट्रवादीने कब्जा केला. जिल्हा परिषदेची सत्ता एकहाती मिळविण्यात काँग्रेसने यश मिळविले आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच विषय समितींवर तीन महिला सभापती कामकाज सांभाळणार आहेत.
समाजकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या सरिता मकेश्र्वर आणि शिवसेनेचे सुधीर सूर्यवंशी यांच्यात निवडणूक झाली. यामध्ये सरिता मकेश्र्वर यांना ३३ मते मिळालीत. शिवसेनेचे सुधीर सूर्यवंशी यांनी नामांकन अर्ज दाखल केला असला तरी सभागृहात शिवसेना, भाजप, प्रहार, रिपाइं, बसप आदी पक्षाचे सदस्य गैरहजर राहिल्याने सूर्यवंशी यांच्या पारड्यात एकही मत पडू शकले नाही. त्यामुळे समाजकल्याण सभापती म्हणून सरिता मकेश्र्वर यांना विजयी घोषित करण्यात आले.
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वृषाली विघे आणि जनसंग्रामच्या राजश्री श्रीराव यांनी नामाकंन दाखल केले होते. या निवडणुकीत वृषाली विघे यांना काँग्रेस वऱ्हाड विकास मंच व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि बसपचा एक अशी सर्वाधिक ३५ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी राजश्री श्रीराव यांना जनसंग्रामची दोन मते मिळाली. त्यामुळे वृषाली विघे यांना विजयी घोषित करण्यात आले.
प्रहारची राष्ट्रवादीला साथ
महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वृषाली विघे यांना काँग्रेसचे २५, बसपा १, वऱ्हाड विकास मंच ५ व प्रहारच्या जिल्हा परिषद सदस्या कविता वसू, कविता दामेधर या दोन महिला सदस्यांनी मतदान करून सर्वच पदाधिकाऱ्यांना धक्का दिला.
विरोधकांची खेळी अयशस्वी
जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने वऱ्हाड विकासमंचसोबत हातमिळवणी करुन सत्ता हस्तगत केली होती. त्यानंतर बुधवारी काँग्रेसमध्ये सभापतीपदासाठी इच्छुकांची मोठी रीघ असल्याने विरोधकांनी या समितींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी खेळी केली. ऐनवेळी विरोधकांचा हा प्रयोग फसल्याने काँग्रेसने बाजी मारली.