फोटो नाही नीट म्हणून मिळाले नाही दिवाळीचे शिधा किट; यशोमती ठाकूर यांचे सरकारला खडेबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2022 14:01 IST2022-10-21T14:00:19+5:302022-10-21T14:01:11+5:30
विद्यमान सरकार केवळ राजकारणासाठी सामान्यांची भावनिक तसेच आर्थिक थट्टा करत असल्याचा यशोमती ठाकूर यांचा आरोप

फोटो नाही नीट म्हणून मिळाले नाही दिवाळीचे शिधा किट; यशोमती ठाकूर यांचे सरकारला खडेबोल
अमरावती : दिवाळी सण ऐन तोंडावर आला असताना दुकानांमध्ये शिधावाटपांच्या पिशवीवर मोदी, शिंदे, फडणवीस यांचे फोटो नाहीत म्हणून सामन्यांना दिवाळी किटपासून वंचित राहावे लागत आहे. विद्यमान सरकार केवळ राजकारणासाठी सामान्यांची भावनिक तसेच आर्थिक थट्टा करत आहे, असे आरोप करीत काँग्रेस नेत्या व माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी ‘शिंदे-फडणवीस’ सरकारवर हल्लाबोल केला.
पूर व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केली जात असून, बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनदेखील पैसे पोहोचले नाहीत, असे त्या म्हणाल्या. आम्हीदेखील सरकारमध्ये होतो, अशी संकट आम्हीपण पाहिली आहेत, असे म्हणत दिवंगत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा दाखला देत तत्कालीन काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांप्रती कशाप्रकारे तत्परता दर्शवली, याचे उदाहरणदेखील त्यांनी यावेळी दिले.
राज्य सरकार फक्त ‘बोलाची कडी अन् बोलाचा भात’ या वृत्तीचे आहे, असे म्हणत काँग्रेस नेत्या व माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी ‘शिंदे-फडणवीस’ सरकारवर टीकास्त्र सोडले.