नांदगाव तहसीलवर काँग्रेसचा मोर्चा
By Admin | Updated: November 17, 2014 22:45 IST2014-11-17T22:45:24+5:302014-11-17T22:45:24+5:30
शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात सोमवारी तहसील कार्यालयावर शेकडो शेतकरी व काँग्रेस मंडळींचा मोर्चा काढण्यात आला.

नांदगाव तहसीलवर काँग्रेसचा मोर्चा
नांदगाव खंडेश्वर : शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात सोमवारी तहसील कार्यालयावर शेकडो शेतकरी व काँग्रेस मंडळींचा मोर्चा काढण्यात आला.
यात सोयाबीनची नुकसान भरपाई प्रतिहेक्टरी वीस हजार रूपये याप्रमाणे द्या, सोयाबीनला ४ हजार रूपये व कापसाला ६ हजार रूपये भाव प्रतिक्विंटल द्यावा. यंदा शेती पिकाचे प्रचंड नुकसान लक्षात घेता आणेवारी ५० टक्क्यांचे आत लावा, शेती सिंचनासाठी लोडशेडींग कमी करून वीज द्या, शेतमजुरीसाठी रोहयोची कामे तातडीने सुरू करून ८ दिवसांत कामाची मजुरी द्या आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता. तालुक्यातून आलेल्या शेतकरी व शेतमजुरांचा मोर्चा गजानन महाराज मंदिरच्या सभागृहातून निघून तहसीलवर आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी आ. वीरेंद्र जगताप, देवीदास सुने, अ. सलामभाई, देवरावजी साखरे, दीपक सवाई यांची भाषणे झाली नंतर तहसीलदार शिवाजी जगताप यांना एका शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.
या मोर्चात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनोद चौधरी, तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नीता सावदे, जि. प. सदस्य संगीता सवाई, पद्माताई शिरभाते, विठ्ठलराव चांदणे, पं. स. सदस्य सविता सवाई, सुधीर पाटेकर, अक्षय पारसकर, अमोल धवसे, राजेंद्र सरोदे, सरफराज खाँ, विनोद जगताप, मारोती रामटेके, अमर कणसे, दीपक सवाई, इद्रिसभाई, इसूबभाई, सतीश पोकळे, जयदीप काकडे, रघुपती गावंडे, किशोर गुलालकरी, अशोक खंडार, प्रदीप ब्राम्हणवाडे, अजय चांदणे, रशीदभाई कुरेशी, जमीलभाई, रऊफभाई व तालुक्यातील बरीच मंडळी उपस्थित होती. (तालुका प्रतिनिधी)