गावगाड्यावर कॉंग्रेसप्रणीत पॅनेलचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST2021-01-19T04:16:56+5:302021-01-19T04:16:56+5:30
पान १ ची मुख्य बातमी अमरावती : जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ५३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी विविध तालुक्यांतील मतमोजणी केंद्रांवर ...

गावगाड्यावर कॉंग्रेसप्रणीत पॅनेलचे वर्चस्व
पान १ ची मुख्य बातमी
अमरावती : जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ५३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी विविध तालुक्यांतील मतमोजणी केंद्रांवर पार पडली. ही ग्रामस्तरावरील निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढविली जात नसली तरी सायंकाळपर्यंत महाआघाडी व भाजपकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण निघण्यापूर्वी जे चित्र सोमवारी उदयास आले, त्यात कॉंग्रेसप्रणीत पॅनेलने गावगाड्यातील या निवडणुकीवर वर्चस्व गाजविल्याचे दिसून आले. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपसह युवा स्वाभिमान, प्रहार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेदेखील ग्रामपंचायतमध्ये शिरकाव केल्याचे चित्र आहे.
सोमवारी सकाळी १० पासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीदरम्यान फेरमतमोजणी करण्याबाबत जिल्ह्यात एकूण १५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यात धामणगाव तालुक्यातून पाच, वरूडमधून चार, अंजनगाव सुर्जी तालुक्यातून तीन व अचलपूर, चांदूर बाजार आणि भातकुली तालुक्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे अर्ज प्राप्त झाले. त्यानुसार १५ ठिकाणी फेरमतमोजणी झाली व निकाल जाहीर झाला, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार यांनी दिली.
जिल्ह्यातील ५५३ पैकी ५३७ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी निवडणूक झाली. जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायती यापूर्वीच पूर्णत: बिनविरोध झाल्या व तीन ग्रामपंचायतींत एकूण जागांपैकी काही जागांसाठी वैध नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्याने तसेच तेथील उर्वरित जागा बिनविरोध झाल्याने तिथे निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे एकूण ४७७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ५३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण मतदानाची टक्केवारी ७५.०५ इतकी होती. मतमोजणीअंती ४ हजार ३९७ सदस्य निवडून आल्याचे जाहीर झाले.
---------------------