चिखलदरा पालिकेवर काँग्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:43 IST2017-12-14T23:43:17+5:302017-12-14T23:43:27+5:30

चिखलदरा पालिकेवर काँग्रेस
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : येथील नगरपालिकेच्या गुरुवारी लागलेल्या निकालात काँग्रेसने नगराध्यक्षपदासह १७ पैकी तब्बल १२ जागांवर विजय संपादन केला. भाजपला पाच जागांवरच समाधान मानावे लागले. भाजपने परिवर्तनाचा दिलेला नारा नाकारत चिखलदरावासीयांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसला साथ दिली आहे.
भाजपने केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज प्रचारासाठी मैदानात उतरविले होते. मात्र, त्याचा प्रभाव मतदारांवर पडला नाही. चिखलदरावासीयांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसला साथ दिली. काँग्रेसचे सरचिटणीस संजय खोडके, माजी आमदार केवलराम काळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी या त्रिमूर्तीने सर्व पदाधिकारी व काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेत गड राखला. भाजपचे सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
निसटता विजय : काँग्रेसच्या सुवर्णा चंदामी, वंदना गवई प्रत्येकी २, मीनल सिंगरोल ५, राजेश मांगलेकर १५, तर नीता सोमवंशी १६ मतांनी विजयी झाल्या आहेत. अपक्षांना विजयाच्या जवळपासही फिरकता आले नाही.
सर्वाधिकार सोमवंशींना
चिखलदरा : नगरपालिकेवर राजेंद्रसिंह सोमवंशी यांच्या माध्यमातून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या निवडणुकीतही काँग्रेस नेत्यांनी त्यांनाच सर्वाधिकार दिले होते. राजेंद्रसिंह सोमवंशी, केवलराम काळे व संजय खोडके या त्रयींसमवेत दयाराम काळे, महेंद्रसिंह गैलवार, मिश्रीलाल झाडखंडे, श्रीपाल पाल, कविता काळे, मनोज शर्मा, जब्बारभाई, सहबूभाई, ओम मिश्रा, अमिरभाई, भिक्कनभाई, नासीर गणी, अफसर हुसैन, प्रदीप चव्हाण, आदर्श गजभिये, दानियल चव्हाण, शफीभाई, अमर गवई आदींनी विजयाकरिता परिश्रम घेतले.
नगराध्यक्षपदाचे अंतर ३१७ मतांचे
थेट नगराध्यक्षपदावर काँग्रेसच्या विजया राजेंद्रसिंह सोमवंशी यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपच्या दुर्गा चौबे यांना ३१७ मतांनी मात मात दिली. विजया सोमवंशी यांना १७२४, तर दुर्गा चौबे यांना १४०७ मते मिळाली. निर्णय घोषित झाल्यानंतर विजया सोमवंशी यांनी मतदारांचे आभार मानले.
गड आला, पण सिंह गेला
काँग्रेसने बड्या नेत्यांशिवाय किल्ला लढविला. त्यामुळे नगराध्यक्षपदासह १७ पैकी नगरसेवकांच्या १२ जागांवर विजय मिळविताना राजेंद्रसिंह सोमवंशी यांचा पराभव कॉँग्रेसजनांच्या मनाला चटका लावून गेला. ते ३१ डिसेंबर रोजी पायउतार होतील.
अरुण तायडे पाचव्यांदा विजयी
चिखलदरा नगरपालिकेत सर्वाधिक पाचव्यांदा सामाजिक कार्यकर्ते अरुण तायडे विजयी झाले आहेत. राजेश मांगलेकर यांनी हॅट्ट्रिक केली, तर मीनल सिंगरोल, नीता सोमवंशी, शेख अब्दुल शेख हैदर, मोना कासदेकर, गीता जामकर, शोभा तिडके आदी नगरसेवक दुसºयांदा विजयी झाले आहेत.