शासनाविरूध्द काँग्रेस रस्त्यावर
By Admin | Updated: February 9, 2015 23:04 IST2015-02-09T23:04:29+5:302015-02-09T23:04:29+5:30
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना सरकारने खोटी आश्वासने देऊन जनहितविरोधी निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ सोमवारी रहाटगाव टी-पॉर्इंटवरील राष्ट्रीय

शासनाविरूध्द काँग्रेस रस्त्यावर
अमरावती : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना सरकारने खोटी आश्वासने देऊन जनहितविरोधी निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ सोमवारी रहाटगाव टी-पॉर्इंटवरील राष्ट्रीय महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक रोखून धरली.
केंद्र व राज्य शासनाच्या जनहित विरोधी निर्णयांच्या विरोधात करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, संजय खोडके, सुधाकर गणगणे, यशोमती ठाकूर, संजय अकर्ते, केवलराम काळे, बबलू शेखावत, विलास इंगोले आदींनी केले.
शासनाने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र, ते पाळण्यात आले नाही. डिझेल व पेट्रोलचे दर नियमानुसार ५० टक्के कमी न करता केंद्र शासनाने जनतेची लूट केली आहे. शेतकऱ्यांच्या जिवावर उठणारा भूमिअधिग्रहण कायदा लागू करुन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. उद्योगपतींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांविरोधी निर्णय घेऊन केंद्र शासनाने जनतेची फसवणूक चालविल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. अन्नसुरक्षा अंशदानाला कात्री लावल्याने राज्यातील १ कोटी ७७ लाख गोरगरीबांवर अन्याय होणार आहे. याशिवाय घरगुती वीज, छोटे उद्योग, पॉवरलूम यांच्या सवलतीत कपात करुन जनतेवर आर्थिक भार लादला आहे. केंद्र व राज्य शासनाने घेतलेले हे जनहितविरोधी निर्णय त्वरित रद्द करावेत, यासाठी जिल्हा काँग्रेस कमितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर राष्ट्रीय महामार्गावर नागपूरवरुन येणारी व अमरावतीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनविरोधी घोषणाबाजी केली.