‘त्या‘ जिल्हा परिषद शाळेतील बेपत्ता शिक्षकांना तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:49+5:302021-07-08T04:10:49+5:30
लेखी खुलासा घेतला; शिक्षण सभापतीच्या दालनात सुनावणी अमरावती : नवीन शैक्षणिक सत्र गत २८ जूनपासून सुरू झाले. शाळा सुरू ...

‘त्या‘ जिल्हा परिषद शाळेतील बेपत्ता शिक्षकांना तंबी
लेखी खुलासा घेतला; शिक्षण सभापतीच्या दालनात सुनावणी
अमरावती : नवीन शैक्षणिक सत्र गत २८ जूनपासून सुरू झाले. शाळा सुरू होण्याच्या चौथ्याच दिवशी जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती सुरेश निमकर यांनी भातकुली तालुक्यातील तीन शाळांना अचानक भेटी दिल्या. शाळेला कुलूप दिसून आले आणि एकही शिक्षण हजर नसल्याचे आढळून होते. याप्रकरणी शाळेवर हजर नसलेल्या त्या ८ शिक्षकांची बुधवारी शिक्षण सभापती यांचे समक्ष सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीनंतर संबधित शिक्षकांना तंबी देत यापुढे असा प्रकार केल्याचे आढळून आल्यास कडक कारवाईचा इशारा शिक्षण सभापती व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद शिक्षण सभापतींनी १ जुलै रोजी भातकुली येथील जिल्हा परिषद कन्या शाळेला दुपारी ३ वाजता भेट दिली. शाळेत २ शिक्षक कार्यरत आहे. अशातच शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार किमान एका शिक्षकांनी शाळेत हजर राहून ऑनलाईन शैक्षणिक कार्य करणे आवश्यक होते. परंतु संबंधित शिक्षक दुपारी २ वाजता घरी गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दुपारी ३.१० वाजता येथील जि.प. मराठी मुलांच्या शाळेला भेट दिली असता, शाळेतील ३ शिक्षकांपैकी दररोज २ शिक्षकांनी उपस्थित राहणे अपेक्षित असताना एकही शिक्षक हजर नसल्याचे आढळून आले. या ठिकाणी कार्यरत सफाई कामगाराकडून माहिती घेतली असता, एक शिक्षिका दुपारी २ वाजताच घरी गेल्याचे सांगण्यात आले. यानंतर शिक्षण सभापतींनी आसरा येथील शाळेला भेट दिली. तेथे एकही शिक्षक हजर नसल्याचे आढळून आले. असाच प्रकार जसापूर शाळेच्या भेटीदरम्यान घडला. अचानक भातकुली तालुक्यातील शाळांना दिलेल्या भेटीत जिल्हा परिषदेच्या चारही शाळांना कुलूप अन् शिक्षक घरी असल्याने शिक्षण सभापतींच्या भेटीत आढळून आले. याप्रकरणी या शाळांतील शिक्षकांची ७ जुलै रोजी शिक्षण सभापतीच्या दालनात सुनावणी घेण्यात आली. यावेळी गैरहजर शिक्षकांनी लेखी खुलासे सादर केले. यावर चर्चेअंती या सर्व शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याची सूचना सभापतींनी केली होती. परंतु, संबंधितांनी यापुढे शाळेच्या वेळेवर हजर राहून शैक्षणिक कार्य नियमाप्रमाणे पार पाडण्याची ग्वाही देत सभापती व अधिकारी यांच्याकडे गळ घातली. त्यामुळे या सर्व शिक्षकांना तंबी देऊन या प्रकारणाला विराम मिळाला. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान, गटशिक्षणाधिकारी घुगे, संबंधित केंद्रप्रमुख आणि शिक्षण समितीचे सदस्य प्रमोद ठाकरे उपस्थित होते.
कोट
१ जुलै रोजी भातकुली तालुक्यातील झेडपी शाळांना अचानक भेटी दिल्यात. दरम्यान चार शाळांना कुलूप लागलेले, तर एकही शिक्षक हजर नव्हता. यामुळे या सर्व शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या समक्ष सुनावणी घेतली. यापुढे असे प्रकार न करण्याच्या हमीवर समज देण्यात आला आहे. यानंतरही गैरहजर आढळणाऱ्या शिक्षकांवर कारवाई केली जाईल.
- सुरेश निमकर,
सभापती शिक्षण समिती