विद्यार्थ्यांमध्ये बीएड प्रवेशाबाबत संभ्रम
By Admin | Updated: June 29, 2015 00:36 IST2015-06-29T00:36:32+5:302015-06-29T00:36:32+5:30
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षणशास्त्र हा अभ्यासक्रम शासनाने शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून दोन वर्षांचा केला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये बीएड प्रवेशाबाबत संभ्रम
माहिती मिळेना : यंदापासून पदवी झाली दोन वर्षांची
अमरावती : गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षणशास्त्र हा अभ्यासक्रम शासनाने शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून दोन वर्षांचा केला आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार यावर्षी प्रवेश होणार आहेत. मात्र अद्यापपर्यंत यासंदर्भात कोणत्याही हालचाली नाहीत. विशेष म्हणजे अद्यापही उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने प्रवेशासाठी आधी जाहिरातदेखील देण्यात आलेली नाही. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांसह शिक्षकही संभ्रमात आहेत.
नऊ महिने कालावधीच्या बीएड अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल करीत यंदापासून हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा करण्यात आला आहे. परंतु खासगी संस्थांनी दोन वर्षांच्या या अभ्यासक्रमाला विरोध केला आहे. तरीदेखील हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार यावर्षी सर्व प्रवेश होणार आहेत. परंतु अद्यापपर्यंत यासंदर्भात कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. पदवी परीक्षांचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच बीएड प्रवेशासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. मात्र यावर्षी पदव्युत्तर वर्गाच्या प्रवेशाला सुरुवात होऊनही बीएड प्रवेशासंदर्भात कोणतीही घोषणा अद्यापपर्यंत करण्यात आलेली नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. उच्च शिक्षण विभागाच्यावतीने अद्यापपर्यंत बीएड प्रवेशासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. याबाबत अधिक माहिती मिळविली असता किमान आठवडाभर तरी जाहिरात प्रसिद्ध होणार नसल्याची माहिती आहे. एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या गोष्टी होत आहेत, तर दुसरीकडे प्रवेशाबाबत प्रथम वर्षाची उदासीनता दिसून येत असल्याने अडचणी वाढणार आहेत. सध्या डी. एड. व बी. एड. नंतर विद्यार्थ्यांसमोर नोकरीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला एवढ्या सहजासहजी विद्यार्थी प्रवेश घेत नाही. (प्रतिनिधी)
शुल्काबाबतही साशंकता
शासनाने अनुदानित व शासकीय बी.एड. महाविद्यालयांच्या शुल्कासंदर्भात आदेश पारित केलेला आहे. मात्र अद्यापही खासगी विनाअनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयांच्या शुल्कासंदर्भात काहीही निर्णय जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे संभ्रम कायम आहे.
एनसीईटी भोपाळकडून दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ५० विद्यार्थ्यांचे एक युनिट याप्रमाणे विविध महाविद्यालयांना पत्र पाठविण्यात आले आहेत. परंतु आम्हाला अद्याप पत्र प्राप्त झालेले नाहीत. त्यानंतरच बी.एड. प्रवेश प्रक्रियेचा निर्णय केंद्रीय परीक्षा समितीच्या निर्णयानंतर होणार आहे.
- वनिता काळे,
प्राचार्य, शिवाजी शिक्षण महाविद्यालय, अमरावती.