वृषभच्या उपचारासाठी कबड्डीपटूंचा संघर्षाचा सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:41 IST2019-01-09T22:40:42+5:302019-01-09T22:41:00+5:30
कर्करोगग्रस्त कबड्डीपटू वृषभ बानासुरे याच्या उपचारासाठी गावातील कबड्डी संघांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. नुकत्याच खानापूर येथे झालेल्या कबड्डीच्या सामन्यांमध्ये नांदगाव पेठ येथील संघांनी तीनही बक्षिसे खेचून आणली. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना विजयी तीनही संघांनी सदर रक्कम वृषभच्या उपचारासाठी देण्याचे जाहीर केले. कबड्डीपटूंची मित्रासाठी चाललेली ही धडपड बघून बक्षीस वितरण सामारंभाला लाभलेले जि.प. सदस्य प्रकाश साबळे यांनीदेखील तातडीने पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली.

वृषभच्या उपचारासाठी कबड्डीपटूंचा संघर्षाचा सामना
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव पेठ : कर्करोगग्रस्त कबड्डीपटू वृषभ बानासुरे याच्या उपचारासाठी गावातील कबड्डी संघांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे. नुकत्याच खानापूर येथे झालेल्या कबड्डीच्या सामन्यांमध्ये नांदगाव पेठ येथील संघांनी तीनही बक्षिसे खेचून आणली. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना विजयी तीनही संघांनी सदर रक्कम वृषभच्या उपचारासाठी देण्याचे जाहीर केले. कबड्डीपटूंची मित्रासाठी चाललेली ही धडपड बघून बक्षीस वितरण सामारंभाला लाभलेले जि.प. सदस्य प्रकाश साबळे यांनीदेखील तातडीने पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली.
वृषभ दादाराव बानासुरे हा २१ वर्षीय कबड्डीपटू तीन आठवड्यांपासून नागपूर येथील रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेत आहे. ऐन उमेदीच्या काळात वृषभवर जीवघेणा प्रसंग ओढवला. नांदगावचे कबड्डीपटू मिळतील त्या ठिकाणी सामन्यातून बक्षीस खेचून आणत ही रक्कम वृषभच्या उपचारावर खर्च करीत आहेत. रविवारी खानापूर येथे वीर भगतसिंग क्रीडा मंडळाच्यावतीने कबड्डीचे सामने घेण्यात आले होते. विदर्भातील २५ संघ सहभागी झाले होते. नांदगाव पेठ येथील सप्तरंग क्रीडा मंडळ, गणेश क्रीडा मंडळ व वीर केसरी क्रीडा मंडळ यांनी दमदार खेळ करून अनुक्रमे तीनही बक्षीस खेचून आणले.
तीनही बक्षिसे एकाच गावात गेल्याने उपस्थितांनी मान्यवरांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र, तीनही संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पारितोषिक रक्कम वृषभसाठी देणार असल्याचे जाहीर करताच त्यांना गहिवरून आले. गहिवरून गेले. रात्री ११ वाजता या सामन्यांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश साबळे, पं.स. समिती सदस्य गणेश कडू, युवक काँग्रेस महासचिव किरण महल्ले, वीर भगतसिंग मंडळाचे अध्यक्ष अविनाश पावडे, अमित गावंडे, अक्षय सरोदे उपस्थित होते.
सीएम चषकातील बक्षिसाची रक्कम वृषभच्या वडिलांच्या स्वाधीन
ग्रामपंचायतच्या प्रांगणात पार पडलेल्या सीएम चषक स्पर्धेत कबड्डी संघाला मिळालेल्या तिन्ही क्रमांकांच्या बक्षिसाची रक्कम संघसहकाºयांनी वृषभचे वडील दादाराव बानासुरे यांच्या स्वाधीन केली. सप्तरंग क्रीडा मंडळ, हिंदवी स्वराज्य क्रीडा मंडळ आणि वीर केसरी क्रीडा मंडळ यांच्या खेळाडूंनी वृषभच्या वडिलांची भेट घेऊन अधिकाधिक रक्कम जुळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कबड्डीपटू राहिलेल्या वृषभच्या उपचारासाठी गावातील सर्व नागरिकदेखील मदतीकरिता एकवटले आहेत. पुढेही उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सर्वांनी सांगितले.