‘द फ्लाईंग बस’च्या वाहकाचा अखेर मृत्यू; जखमी चालकावर उपचार सुरू
By प्रदीप भाकरे | Published: December 8, 2022 05:24 PM2022-12-08T17:24:15+5:302022-12-08T18:02:49+5:30
एसटी बसचे स्टेअरिंग झाले होते जाम : तीन क्रेनच्या साहाय्याने काढली होती बस
अमरावती : नांदगाव पेठ येथील उड्डाणपूलावर एसटी बसचा अपघात होऊन ती बस उड्डाणपूलाच्या कठड्याला जाऊन धडकली होती. त्यात चालक वाहक गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरेने दाखल करण्यात आले. मात्र त्यातील गंभीर जखमी असलेल्या वाहकाचा रात्रीच उपचारादरम्यान मृत्यू झाला. बसचे स्टेअरिंग जाम झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास हा अपघात घडला होता. गजानन वाकपांजर (४१, रा. थिलोरी ता. दर्यापूर) असे मृत वाहकाचे नाव आहे.
नागपूर आगाराची औरंगाबाद नागपूर बस (एम.एच. ४० वाय ५८२८) ही अमरावती बसस्थानकाहून बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान नागपूर जायला निघाली. ही बस सात वाजताच्या दरम्यान नांदगाव पेठ उड्डाणपूलावर पोहचताच ती कठड्यावर जाऊन धडकली. यात गजानन वाकपांजर हे बसमधून खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तर बस चालक केशव धोटे हे सुद्धा जखमी आहेत. ३२ प्रवासी घेऊन जाणारी ही एसटी बस अपघातानंतर उड्डाणपूलावर लटकली होती.
एसटी चालकाविरुद्ध गुन्हा
दरम्यान, एमएच ४० वाय ५८२८ या बसने मागून आपल्या मालवाहू वाहनाला धडक दिली. यात आपल्या वाहनाचे नुकसान झाले. तर बस चालकाने त्याची बस उड्डाणपुलाच्या कठड्यावर चढविली. पुढे ती कठड्याला अधांतरी लटकली. यात आपल्याला मार लागल्याची तक्रार रोशन पवार (२८, रा. केकतपूर) यांनी नोंदविली. तक्रारीनुसार, नांदगाव पेठ पोलिसांनी एसटी बसचालक केशव धोटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.