स्थिती दुष्काळजन्य

By Admin | Updated: September 19, 2015 00:02 IST2015-09-19T00:02:30+5:302015-09-19T00:02:30+5:30

जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केली.

Condition drought | स्थिती दुष्काळजन्य

स्थिती दुष्काळजन्य

नजरअंदाज पैसेवारी ५९ पैसे : ६७ पैशांच्या आत पैसेवारीचे सुधारित निकष
लोकमत विशेष

गजानन मोहोडअमरावती
जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जाहीर केली. सर्व तालुक्यांची सुधारीत पैसेवारी ही ५९ पैसे आहे. तथापी शासनाने १६ सप्टेंबरला उशीरा घेतलेल्या निर्णयानुसार पैसेवारीचे यापूर्वीचे निकष बदललेले सुधारित पद्धतीनुसार ६७ पैशापेक्षा कमी व ६७ पैश्यापेक्षा जास्त असे दुष्काळजन्य स्थितीचे निकष ठरले आहे. जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ६७ पैशांच्या आत असल्याने सोयी-सवलती मिळणार आहेत.
अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागाची नजरअंदाज पैसेवारी ही दरवर्षी ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात येत असते. परंतु यंदा या तीनही विभागांसह राज्यात असणारी दुष्काळसदृश जाहीर करण्याच्या अनुषंगाने चालू हंगामात ३० सप्टेंबर ऐवजी १५ सप्टेंबर तारीख समजून तीनही विभागाची नजरअंदाज पैसेवारी तत्काळ जाहीर करावी, असे महसूल विभागाचे उपसचिव मंदार पोहोरे यांनी १५ सप्टेंबरला विभागीय आयुक्तांना निर्देश दिले होते. या आदेशाच्या दुसऱ्याच दिवशी १६ सप्टेंबरला शासनाने पैसेवारी काढण्याची सुधारित पद्धत जाहीर केली. या आदेशान्वये मागील पाच वर्षाच्या कालावधीतील उत्पन्नाची सरासरी हे प्रमाण उत्पन्न समजून ६७ पैशाच्या कमी व जास्त असे पैसेवारी आलेली गावे घोषित करावी, असे आदेश शासनाने दिलेत.

सर्व विभागाची पैसेवारी एकाच वेळी
राज्यातील कोकण, पुणे व नाशीक विभागाची नजरअंदाज पैसेवारी १५ सप्टेंबरला जाहीर करण्यात येते व औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागाची ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात येत असते. किंबहुना राज्यातील दुष्काळसदृष्य स्थिती जाहीर करण्याच्या अनुषंगाने शासनाने सर्व विभागांची नजरअंदाज पैसेवारी १५ सप्टेंबरला एकाच वेळी जाहीर करण्याच्या अनुषंगाने १५ सप्टेंबरला हा निर्णय घेतला.

पैसेवारीच्या ५० पैशाचे
निकष बदलले

शासनाने ४ मार्च १९८९ चे ठरावानुसार लगतच्या मागील १० वर्षांच्या कालावधीत ३ उत्तम उत्पन्नाची सरासरी हे प्रमाण समजून ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांना सोयीसवलती देण्यात येतात. मात्र शासनाने १६ सप्टेंबर रोजी पैसेवारीचे प्रचलित निकष बदलविले, या नव्या निकषानुसार मागील पाच वर्षाच्या कालावधीतील उत्पन्नाची सरासरी हे प्रमाण उत्पन्न समजून ६७ पैशांपेक्षा कमी व ६७ पैश्यापेक्षा जास्त असे पैसेवारीचे निकष ठरविण्यात आलेले आहेत.

केंद्राला करणार मदतीची मागणी
जून महिन्यात पेरणीपासून पावसाची दडी व त्यानंतर पुन्हा पावसाची प्रदीर्घ दडी यामुळे राज्यात एकाही जिल्ह्याने पावसाची अपेक्षित सरासरी पार केलेली नाही. राज्यात दुष्काळसदृष्य स्थिती आहे व ही दुष्काळ स्थिती जाहीर करून केंद्र शासनाकडून मदतीची ज्ञापन पाठविण्यात येणार आहे.

Web Title: Condition drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.