गाडगेबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2016 00:35 IST2016-12-22T00:35:48+5:302016-12-22T00:35:48+5:30
वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांचा ६० वा पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप बुधवारी झाला. सकाळी १० वाजता काढण्यात आलेल्या ...

गाडगेबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप
प्रतिमेची शोभायात्रा : गोपाला-गोपाला देवकीनंदन गोपालाचा जयघोष
अमरावती: वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांचा ६० वा पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप बुधवारी झाला. सकाळी १० वाजता काढण्यात आलेल्या गाडगेबाबांच्या प्रतिमेच्या शोभायात्रेने अवधी अंबानगरी दुमदुमली. काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने पुण्यतिथी महोत्सवाची सांगता झाली.
१४ ते २१ डिसेंबर दरम्यान गाडगेनगर येथील गाडगेबाबांच्या समाधीस्थळी श्री संत गाडगे बाबांचा ६० वा पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आठ दिवस येथे भरगच्छ कार्यक्रमाचे व बाबांच्या जीवन कार्यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी गाडगेनगर, राधानगर, प्रेरणा कॉलनी, संजीवनी कॉलनीतून बाबांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी मुलांनी गाडगेबाबांची वेशभुषा साकारुन हातात खराटा घेतल्याने अनेकांचे लक्ष वेधले.
यावेळी लक्ष्मण महाराज काळे यांचे काल्याचे किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. प्राचार्य अरविंद देशमुख यांचेही व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. गाडगेबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्य येथे भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेत नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
शिवाजी कुचे यांचे इंग्रजीत मार्गदर्शन
जेष्ठ समाजसेवक तथा इंग्रजीचे शिक्षक शिवाजी कुचे यांचे गाडगेबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्य ‘इंग्लिश विषयाचे महत्व व त्यांचे आपल्या जीवनातील स्थान’ या विषयावर मंगळवारी व्याख्यान पार पडले. त्यांनी गाडगेबाबांच्या कार्यावरही विविध दाखले देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांनी आई- वडीलांची सेवा केली पाहिजे व गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर त्यांनी इंग्रजीतून आपले मत व्यक्त केले. यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते.