संगणक केंद्र कुचकामी तलाठी कार्यालयात गर्दी
By Admin | Updated: May 18, 2015 00:11 IST2015-05-18T00:11:06+5:302015-05-18T00:11:06+5:30
शासनाने प्रत्येक तालुकास्थळी संगणकावर अद्ययावत सातबारा मिळण्याची सोय केली असली तरी येथील तहसील कार्यालयात दोन ...

संगणक केंद्र कुचकामी तलाठी कार्यालयात गर्दी
फजिती : कर्जासाठी बँका मागतात अद्ययावत सातबारा
प्रभाकर भगोले चांदूररेल्वे
शासनाने प्रत्येक तालुकास्थळी संगणकावर अद्ययावत सातबारा मिळण्याची सोय केली असली तरी येथील तहसील कार्यालयात दोन वर्षांपूर्वीची नोंद असल्याने शेतकरी अद्ययावत सातबारासाठी तलाठी कार्यालयाकडे धाव घेत आहेत. राष्ट्रीयीकृत बँक अधिकारी अद्ययावत शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणासाठी सातबाराचा आग्रह धरतात. शासनाने आॅनलाईन सुविधा देण्याची प्रक्रिया सर्वच शासकीय कार्यालयांत सुरू असताना चांदूररेल्वे तहसील कार्यालयाच्या भोंगळ कारभाराने शेतकऱ्यांना हेलपाटे घेण्याची पाळी आली आहे.
शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाकडे न जाता तहसील कार्यालयात त्यांच्या मालकीचा ७/१२ ची तीस रूपये रोख देऊन प्रत्येक तहसील कार्यालयात सोय करण्याची प्रक्रिया राज्यभर सुरू आहे. संगणक स्थळी कर्मचाऱ्यांची नेमणूकही आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना ही माहिती नसेल ते तहसील कार्यालयात ७/१२ मिळते, या उद्देशाने ग्रामीण भागातून येतात आणि बँक अधिकाऱ्यांनी ७/१२ ची पाहणी केल्यानंतर हा ७/१२ २०१३ चा आहे. आता २०१५ चा ७/१२ आणा यानंतर शेतकरी तलाठ्याचा शोध घेऊन तलाठी कार्यालय गाठून शेताचे उतारे घेतात. परंतु चांदूररेल्वे तहसील कार्यालयात ठाण मांडून बसणारे अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून याबाबत दखल घेत नसल्याने याबाबत वरिष्ठांकडेही तक्रारी झाल्याची चर्चा आहे. अधिकारीही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने कसेतरी टाईमपास सुरू असल्याची चर्चा तहसील कार्यालयात सुरू राहते. शेतकऱ्यांना घ्यावे लागणाऱ्या हेलपाट्याची दखल घेईल कोण, असा प्रश्न सध्या तरी शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.