कम्पोस्ट डेपोत तीन लाख केव्हिक मीटर कचरा तुंबून
By Admin | Updated: October 3, 2015 00:19 IST2015-10-03T00:19:11+5:302015-10-03T00:19:11+5:30
सुकळी येथील महापालिकेच्या कम्पोस्ट डेपोत तीन लाख मीटर कचरा तुंबून असल्याने हा प्रश्न गंभीर झाला आहे.

कम्पोस्ट डेपोत तीन लाख केव्हिक मीटर कचरा तुंबून
आजार बळावतोय : सीमेवरील नागरी वस्त्यांना धोका
अमरावती : सुकळी येथील महापालिकेच्या कम्पोस्ट डेपोत तीन लाख मीटर कचरा तुंबून असल्याने हा प्रश्न गंभीर झाला आहे. परिणामी कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली नाही तर सीमेवरील नागरी वस्त्यांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हल्ली वातावरण विषाणुजन्य असल्याने लहान मुलांचे आजार बळावले आहे.
अमरावती शहराचा ‘स्मार्ट सिटी’त समावेश झाला ही आनंददायी बाब असली तरी कम्पोस्ट डेपोत तुंबून राहणाऱ्या कचऱ्याची समस्या कधी सुटणार हा प्रश्न निरुत्तरीय आहे. कम्पोस्ट डेपोतील कचऱ्याची टेकडी ही आता ७० ते ८० फुटावर पोहचली असून जागेअभावी तिची उंची वाढतच चालली आहे. तर कचऱ्याची उंच टेकडी समांतर करण्यासाठी बुलडोजरची मदत घेतली जात आहे. यापूर्वी कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प साकारण्याची जबाबदारी हरियाणाच्या गुडगाव येथील इको फिल कंपनीकडे सोपविण्यात आली होती. शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन जागेवर हा प्रकल्प साकारण्यासाठी अकोली रेल्वे लाईन जवळील १८ हेक्टर जमीन हस्तातरीत करण्यात आली होती. परंतु खत निर्मितीसाठी जागा अधिग्रहणाला प्रकल्पग्रस्तांनी विरोध केला.
दरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मध्यस्थी करुन कम्पोस्ट डेपोसाठी नवीन जागा शोधण्याचे ठरवित प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका घेतली. त्यानुसार महसूल विभागाने ई क्लास जमिनीचा शोध घेतला. परंतु ई क्लास जमिन कम्पोस्ट डेपोकरीता मिळाली नसल्याची माहिती आहे. ९ हेक्टर जागेवर हल्ली असलेल्या कम्पोस्ट डेपोत दरदिवसाला कचरा साठविण्याची प्रक्रिया सुरु आहे. कचऱ्याची विल्हेवाट लागत नाही. त्यामुळे कम्पोस्ट डेपो परिसर जीवघेणी ठरु लागला आहे. या कम्पोस्ट डेपोत घाण, मृत प्राण्यांचे अवशेष, केर कचरा, कुजलेले पदार्थ तुंबून राहत असल्याने सीमेवरील नागरी वस्त्यांना गंभीर आजार होण्याची दाट शक्यता आहे. कचरा डेपोची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी शामसुंदर सोनी यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.