निकष पूर्ण, अमरावती होणार स्मार्ट सिटी!
By Admin | Updated: July 19, 2015 00:02 IST2015-07-19T00:02:59+5:302015-07-19T00:02:59+5:30
केंद्र शासनाने ‘स्मार्ट सिटी’ योजनेत शहरांचा समावेश करण्यासाठी लादलेल्या अटी, नियम व निकष पूर्ण करण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे.

निकष पूर्ण, अमरावती होणार स्मार्ट सिटी!
\महापालिकेने प्रस्ताव पाठविला : प्रमुख शहरांमध्ये समावेशासाठी प्रयत्न
अमरावती : केंद्र शासनाने ‘स्मार्ट सिटी’ योजनेत शहरांचा समावेश करण्यासाठी लादलेल्या अटी, नियम व निकष पूर्ण करण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे. अमरावती शहराचा या योजनेत समावेश व्हावा, यासाठी स्मार्ट सिटीचे निकष पूर्ण करुन राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परिणामी स्मार्ट सिटीत समावेशासाठी अमरावतीे शहराचे हे पहिले पाऊल मानले जात आहे.
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी अमरावती शहराचा ‘स्मार्ट सिटी’ या योजनेत समावेश करुन देशातील प्रमुख शहरांत नावलौकिक व्हावा, यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत. ‘स्मार्ट सिटी’ या योजनेत समावेशासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपये उभारणे हे आव्हान आयुक्तांनी स्वीकारले आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या सहसचिव सीमा ढमढेरे यांना पाठविलेल्या प्रस्तावात २० मार्च २०१५ रोजी पार पडलेल्या महापालिका सर्वसाधारण सभेने घेतलेल्या ठरावाचा दाखला देत आयुक्तांनी ‘स्मार्ट सिटी’ चे निकष पूर्ण करण्याची ग्वाही घेतली आहे.
दिल्ली येथे नुकतीच स्मार्ट सिटी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महापालिकांचे आयुक्त, महापौरांची बैठक घेवून या योजनेचे नियम, अटी स्पष्ट केल्या आहेत.. या बैठकीला महापौर चरणजितकौर नंदा, आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे देखील हजर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकष स्पष्ट केल्यानुसार अमरावती शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आल्यास केंद्र व राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात विकासाच्या योजना राबविण्यासाठी अनुदान उपलब्ध होईल. या योजनेत अमरावती शहराचा समावेश व्हावा, यासाठी महापालिकने तयारी चालविली असून शासन स्तरावर पत्रव्यवहार केला जात आहे.
अमरावती शहराचे स्मार्ट सिटी या योजनेत नक्कीच समावेश होईल. उत्पन्नाची बाजू सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन आर्थिक बाजू सुधारली जाईल. शासनाकडे निकष पूर्ण करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे.
-चंद्रकांत गुडेवार, आयुक्त,