गुरूकुंज उपसा सिंचन योजना पूर्ण करा
By Admin | Updated: April 23, 2016 00:08 IST2016-04-23T00:08:31+5:302016-04-23T00:08:31+5:30
तालुक्यातील अंदाजे १५ गावांतील सिंचनाचे ७ हजार १०९ हेक्टर क्षमता असलेल्या महत्त्वाकांक्षी गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे,

गुरूकुंज उपसा सिंचन योजना पूर्ण करा
मागणी : यशोमती ठाकूर यांनी मांडला मुद्दा
तिवसा : तालुक्यातील अंदाजे १५ गावांतील सिंचनाचे ७ हजार १०९ हेक्टर क्षमता असलेल्या महत्त्वाकांक्षी गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत केली.
लहरी निसर्गामुळे जमिनीतील जलस्तर घटल्यामुळे सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला होता. अप्पर वर्धा धरणाचा उजवा मुख्य कालवा तालुक्यातून गेला असताना आम्हाला मात्र सिंचनाकरिता याचा फारसा लाभ होत नाही. या पृष्ठभूमिवर तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळावे, यासाठी आ. यशोमती ठाकूर यांनी शासन, प्रशासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांची फलश्रृती म्हणून अखेर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत १३ जुलै २००८ नुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानुसार उजव्या मुख्य कालव्याच्या मीटरवरून पाणी उचल करण्याचे यामध्ये प्रस्तावित आहे. २१२.६३ कोटी रुपये खर्च असलेल्या या योजनेंतर्गत तालुक्यातील १५ गावातील ७ हजार १०९ हेक्टर लाभक्षेत्र राहणार आहे. त्यानंतर काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे योजनेचे काम संथगतीने सुरू होते. त्यामुळे महत्वपूर्ण योजना जलदगतीने पूर्ण व्हावी, याकरिता आ. यशोमती ठाकूर यांनी पुन्हा एकदा यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा केल्यामुळे पाईपलाईनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. (प्रतिनिधी)