दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट नियोजित वेळेत पूर्ण करा
By Admin | Updated: May 30, 2016 00:41 IST2016-05-30T00:41:50+5:302016-05-30T00:41:50+5:30
पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दीर्घ आयुष्यी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे.

दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट नियोजित वेळेत पूर्ण करा
पालकमंत्री : जिल्हा, तालुकास्तरीय विविध योजनांचा आढावा
अमरावती : पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दीर्घ आयुष्यी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. यामुळेच जमिनीची धूप कमी होऊन भूगर्भातील पाण्याची पातळी स्थिर राहील. पयार्याने पाणीटंचाईवर मात करता येईल. जिल्ह्यात यावर्षी दोन कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करून अधिकाधिक वृक्षांची निर्धारित वेळेत लागवड करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जलयुक्त शिवार, महात्मा गांधी रोजगार हमी योजनांतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय विविध योजनांचा पालकमंत्र्यांनी शनिवारी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी किरण गीत्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) काळे, तहसीलदार सुरेश बगळे, कृषी, जलसंपदा व जलसंधारण, विद्युत, आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर वृक्ष लागवड कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी १ जुलैपासून ठरविले आहे. कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यात पाच गावांची निवड करून किमान ५० शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करावे. आतापर्यंत जिल्ह्यात १४ तालुक्यांमध्ये ७० गावांची निवड झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड नसेल त्यांना जॉब कार्ड पुरवून शेतात वृक्षांची लागवड व संगोपनासाठी प्रवृत्त करावे. यासाठी कमीत कमी पाच फुटांचे रोप किंवा कलम शेतकऱ्यांना सामाजिक वनीकरण विभागाने उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यासाठी कामे प्राधान्याने पूर्ण करून निधी उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यात ४०० पांदण रस्ते लोकसहभागातून तयार झाली आहेत. अपूर्ण रस्ते पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करावीत. खरीप पिकांच्या लागवडीकरिता उत्कृष्ट दर्जाचे बियाणे व खत पुरवठा शेतकऱ्यांना करावा. यासाठी कृषी विभागाने महाबीज व इतर प्रणालींना शेतकऱ्यांची मागणी कळवून पूर्तता करावी. विभागात सुमारे साडेपाचशे कोटी पीककर्ज वितरणाची शासकीय कार्यवाही पूर्ण झाली आहे.
बैठकीत पांदण रस्ते, धडक सिंचन विहीर व नरेगा विहीर, कृषी पंप विद्युत जोडणी, बियाणे, जलयुक्त शिवार अभियान व इतर आवास योजना या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा यावेळी झाली. बैठकीला महसूल, कृषी, पशुसंवर्धन, जलसंपदा व जलसंधारण, जि.प. विद्युतचे कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)