नगरपंचायतींची स्थापना पूर्ण, आता प्रतीक्षा प्रभाग रचनेची
By Admin | Updated: June 3, 2015 00:28 IST2015-06-03T00:28:57+5:302015-06-03T00:28:57+5:30
जिल्ह्यातील चार तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये करण्यात आले.

नगरपंचायतींची स्थापना पूर्ण, आता प्रतीक्षा प्रभाग रचनेची
जितेंद्र दखने अमरावती
जिल्ह्यातील चार तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये करण्यात आले. त्यामुळे नगरपंचायतीची स्थापना झाली. मात्र आता या ठिकाणी प्रभाग रचनेची प्रतीक्षा पुढाऱ्यांना लागली आहे. जिल्ह्यातील धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व भातकुली या चार तालुक्यांच्या ठिकाणी आतापर्यंत ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. मात्र काही महिन्यांपूर्वी या चार तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत करण्यात आले. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींचे निवडणूक नगरपंचायतीमुळे होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आता विद्यमान सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतींच्या पुढाऱ्यांना प्रभागरचनेची उत्सुकता लागली आहे. या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून स्थानिक नेत्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. ग्रामपंचायत असून शहर व तालुक्यांचे मुख्यालय असल्याने येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा मान मोठा होता. अशातच राज्य शासनाने जिल्ह्यातील चार ग्रामपंचायती बरखास्त करून याठिकाणी नगरपंचायती स्थापन करण्याचा निर्णय घेऊन या नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतींवर प्रशासक म्हणून अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही केल्या आहेत. त्यामुळे सध्या या नगरपंचायतींचा कारभार प्रशासक असलेले अधिकारी सांभाळत आहेत. परंतु नगरपंचायत अस्तित्वात आल्याने काही दिवसांत निवडणुका लागणार असून या निवडणुकीसाठी प्रभागरचना व अन्य प्रक्रिया त्यापूर्वी होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायत अस्तित्वात आल्याने अनेक प्रकारचे बदल यात होणार आहेत. त्यादृष्टीने शासन व प्रशासन स्तरावर नगरपंचायत स्थापनेनंतर करावयाच्या उपाययोजनाबाबत हालचाली सुरू नसल्याने येथील पुढाऱ्यांना मात्र प्रभाग रचना व अन्य उपाययोजनांची उत्सुकता लागली आहे.
या आहेत नवीन नगरपंचायती
जिल्ह्यातील चार ग्रामपंचायती बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे धारणी, तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्र्वर या चार तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नव्याने नगरपंचायती अस्तित्वात आल्या आहेत.
नव्याने ज्या चार नगरपंचायती अस्तित्वात आल्यात, त्या ठिकाणी प्रशासनाने प्राथमिक स्तरावर सध्या असलेल्या वॉर्ड, लोकसंख्या, याची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र प्रभाग रचनेबाबत अद्याप कार्यक्रम प्राप्त झाला नाही.
- राम सिध्दभट्टी,
प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी अमरावती.