‘कोरोना रॅकेट’संबंधी तक्रार तथ्यहीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:16 IST2021-02-27T04:16:28+5:302021-02-27T04:16:28+5:30
अमरावती : विम्याची रक्कम लाटण्यासाठी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह हवा की निगेटिव्ह, हे ठरविणारे रॅकेट सक्रिय असल्याची तक्रार तथ्यहीन ...

‘कोरोना रॅकेट’संबंधी तक्रार तथ्यहीन
अमरावती : विम्याची रक्कम लाटण्यासाठी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह हवा की निगेटिव्ह, हे ठरविणारे रॅकेट सक्रिय असल्याची तक्रार तथ्यहीन असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत स्पष्ट केले. यासंबंधी पुरावे तक्रारकर्ते प्रकाश साबळे सादर केले नसल्याने हा आरोप सिद्ध होऊ शकला नाही, असे त्यांनी नमूद केले. दुसरीकडे प्रकाश साबळे यांनी पुरावे शोधण्याचे काम हे प्रशासनाचे असल्याचे स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेची २२ फेब्रुवारी रोजी आमसभा पार पडली. यात सदस्य प्रकाश साबळे यांनी कोरोना संसर्गातच विम्याची रक्कम लाटण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे खोटे अहवाल मिळवून देणारे रॅकेट शहरात सक्रिय असल्याचा आरोप केला होता. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी या विषयात सविस्तर चौकशी केली. सुमारे १७१ कोरोनाग्रस्त नागरिकांशी त्यांनी दूरध्वनीहून संवाद साधला. मात्र, साबळे यांच्या आरोपाला दुजोरा मिळालेला नाही, असे येडगे यांचे म्हणणे आहे.
अमोल येडगे यांनी प्रकाश साबळे यांना याबाबत पुरावे सादर करण्यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, साबळे यांनी ठोस पुरावे सादर केले नसल्याचे त्यांनी सांगितले. येडगे यांनी २६ फेब्रुवारी रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना अहवाल सादर केला. त्यामध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे.
----------
काय आहे तक्रार?
साबळे यांच्या तक्रारीनुसार, लक्षणे नसतानाही अमरावतीत कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होतो आणि त्याआधारे पुढे विम्याचे संरक्षण प्राप्त करता येते. अशी कामे करण्यासाठी येथे एक रॅकेट सक्रिय झाले आहे.
--------
अहवालात काय?
चौकशीदरम्यान प्रकाश साबळे यांच्या आरोपाला दुजोरा मिळू शकला नाही. आपल्याकडे याबाबतचे सबळ पुरावे आहेत, असे म्हणणाऱ्या साबळे यांनीही दोन दिवसांची मुदत दिली असताना, कोणताही पुरावा चौकशी समितीसमोर सादर केला नाही, असेही येडगे यांच्या अहवालात म्हटले आहे.
कोट
वास्तविक परिस्थिती मी बाहेर आणली. या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी करणे हे प्रशासनाने काम आहे, माझे नाही. कोविड विम्याचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. आरोपांवर आजही ठाम असून, विम्याचा लाभ घेतलेल्या काही रुग्णांची माहिती घेऊन त्यांची ॲन्टिबॉडी टेस्ट करावी. त्यातून तथ्य बाहेर येऊ शकते.
- प्रकाश साबळे, जिल्हा परिषद सदस्य
कोट
जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या आरोपावरून १७१ पाॅझिटिव्ह रुग्णांशी संवाद साधला. त्यावेळी आरोपाबाबत काही तथ्य आढळून आले नाही. याबाबत साबळे यांनी पुरावे दिले नाहीत. अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला, त्यानुसार पुढील निर्णय त्यांच्या स्तरावर होईल.
- अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी