महापालिकेत मालमत्ता कर वसुलीसाठी स्पर्धा
By Admin | Updated: November 17, 2014 22:45 IST2014-11-17T22:45:03+5:302014-11-17T22:45:03+5:30
इमारती, रहिवासी घरांवर आकारण्यात आलेल्या मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महापालिकेत कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. पाचही झोनचे सहायक आयुक्त कर वसुलीत अव्वल राहण्यासाठी

महापालिकेत मालमत्ता कर वसुलीसाठी स्पर्धा
अमरावती : इमारती, रहिवासी घरांवर आकारण्यात आलेल्या मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महापालिकेत कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. पाचही झोनचे सहायक आयुक्त कर वसुलीत अव्वल राहण्यासाठी जीवाचे रान करीत आहे. दुसरीकडे आयुक्तांनी उत्कृष्ट वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गौरविण्याचा निर्णय घेतल्यामुळे कोण अव्वल, कोण सरस राहील, यासाठी आपसातच चढाओढ सुरु असल्याचे चित्र आहे.
सन २०१४-२०१५ या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता कराचे ५५ कोटी रुपये अपेक्षित आहे. एलबीटीची वसुली मंदावल्याने महापालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावली आहे. परिणामीे मालमत्ता कर, बाजार परवाना, सहायक संचालक नगररचना विभागाच्या उत्पन्नावर महापालिकेचा डोलारा सुरु आहे. एलबीटीनंतर मालमत्ता कर हेच उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असल्यामुळे आयुक्त अरुण डोंगरे यांनी मालमत्ता कर वसुलीचे लक्ष केले आहे. पाचही झोनचे सहायक आयुक्त, प्रभागीय अधिकारी, मुल्य निर्धारक कर संकलन अधिकारी, कर वसुली लिपिक आदींच्या वारंवार बैठकी घेऊन मालमत्ता कर वसुलीसाठी उपाययोजना करण्यात आल्यात. त्यामुळे १ एप्रिल ते १४ नोव्हेंबर २०१४ यादरम्यान ११ कोटी ४८ लाख, ५१ हजार, ४४७ रुपये मालमत्ता कर वसुलीचे तिजोरीत जमा झाले आहे. मालमत्ताधारकांनी नियमितपणे कराचा भरणा करावा, यासाठी सुटीच्या दिवशीही कर वसुली शिबिराचे आयोजन करुन धडक मोहीम राबविण्यात आली. परिणामी अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या मालमत्ता कर वसुलीचा वेग वाढला.
एप्रिलपर्यंत कर वसुलीचा हा सपाटा असाच कायम रहावा, यासाठी सहायक आयुक्तांना अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उत्कृष्ट कर वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सत्कार करुन त्यांना बक्षीस देऊन गौरविले जाणार आहे. त्यामुळे कामचुकारपणा करण्याचा दाग असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये कर्तव्याची जाण आली आहे.
सकाळपासूनच कर वसुली लिपिक जनतेच्या दारी पोहचून मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. कर वसुलीचा नित्यक्रम असाच सुरु रहावा, यासाठी आयुक्त दर आठवड्याला कर वसुलीचा मागोवा घेत आहेत.
मात्र कर वसुलीत अव्वल राहण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्याची शक्कल लढवीत असताना उत्कृष्ट पुरस्कार पटकाविण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये जणू स्पर्धाच सुरु असल्याचे दिसून येते. आतापर्यंतच्या कर वसुलीत प्रभाग झोन क्रमांक १ अव्वल असून सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी नवनवीन संकल्पना राबवून कर वसुलीत आघाडी घेतली आहे.