मोबदला धनादेशाने; अनादरणाने फसवणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:13 IST2021-03-16T04:13:29+5:302021-03-16T04:13:29+5:30
वनोजा बाग : शेतकऱ्यांच्या हलाखीचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून माल घेऊन महिनोनमहिने पैसे रोखून त्रास देण्याचा प्रकारात अलीकडे ...

मोबदला धनादेशाने; अनादरणाने फसवणूक!
वनोजा बाग : शेतकऱ्यांच्या हलाखीचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून माल घेऊन महिनोनमहिने पैसे रोखून त्रास देण्याचा प्रकारात अलीकडे चांगलीच वाढ झाली आहे.व्यापाऱ्यांविरुद्ध दोन-तीन प्रकरणे पोलीस ठाण्यात पोहोचली तरी शेतकऱ्यांना मात्र त्यांच्या धान्यादी मालाचा मोबदला मिळालेला नाही. त्याला आता व्यापाऱ्यांसोबतच पोलीस ठाणे व बाजार समितीचा उंबरठा झिजवावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या धान्य व अन्य मालाचा मोबदला धनादेशाने द्यायचा, पुरेशी रक्कम नसल्याने तो बाऊन्स करवून घ्यायचा अन् नंतर शेतकऱ्यांना आपल्या मागे पुढे फिरवायचे, असा नवे प्रकार तालुक्यात कैकदा घडत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी आकोट येथील पाच शेतकऱ्यांचे उमर जिनिंगच्या मालकाने थकवलेले पैसे बाजार समितीने मध्यस्थी करून मिळवून दिले. त्याला एक महिनाही पूर्ण होत नाही तोवर पुन्हा तालुक्यात त्याच कापूस व्यापाऱ्याने पुन्हा अकोट तालुक्यातीलच चार कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ११ लाख १८ हजार ७२० रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण उघड झाले. बाजार समितीच्या वांधा कमिटीसमोर तक्रार दाखल करीत बाजार समिती व शेतकऱ्यांच्यावतीने अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु, पोलीस विभागातर्फे नेहमीप्रमाणे चौकशीचा फार्स सुरू आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला नाही. या व्यवहारात दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.
जिनिंग व्यवसायिकाच्या म्हणण्यानुसार, सदर तक्रारदार हे शेतकरी नसून, व्यापारी असल्याचे आरोप करीत आहेत. प्रत्यक्षात लहान व्यापारी गावातील गरजू शेतकऱ्यांकडून कापूस विकत घेतात. काही रक्कमही देतात. ते बड्या व्यापाऱ्यांना विकतात, हीदेखील वस्तुस्थिती आहे. मात्र, माल खरेदी केल्याच्या तारखेनंतर ‘पोस्ट डेटेड चेक’ देऊन प्रत्यक्षात त्या खात्यात पैसे न ठेवण्याचा उद्योग तालुक्यात भरभराटीस आला आहे. त्यात अनेक शेतकरी नाडवले जात आहेत. पोलीस मात्र चौकशीच्या नावावर वेळ दवडत असल्याचा आरोप होत आहे.