२७१ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 23:18 IST2018-12-18T23:18:10+5:302018-12-18T23:18:29+5:30
एप्रिल महिन्यात झालेला अवेळी पाऊस, गारपिटीमुळे शेतीपिके व फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील २३७.७० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्याची नुकसानभरपाई म्हणून जिल्ह्याला ३४.१३ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

२७१ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एप्रिल महिन्यात झालेला अवेळी पाऊस, गारपिटीमुळे शेतीपिके व फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील २३७.७० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्याची नुकसानभरपाई म्हणून जिल्ह्याला ३४.१३ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २३७ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळेल.
राज्यात एप्रिल महिन्यात अमरावतीसह २५ जिल्ह्यांमध्ये अवेळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. त्या अनुषंगाने राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीच्या निकषानुसार मदत देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.
राज्यातील सहा विभागांमधील २५ जिल्ह्यांतील बाधित १२ हजार ७२६ शेतकऱ्यांना ८.१४ कोटी रुपये वितरित करण्यास महसूल व वनविभागाने १८ डिसेंबररोजी मान्यता दिली. त्यात अमरावती जिल्ह्यातील २७१ शेतकऱ्यांना ३४.१३ लाख रुपये मदत दिली जाणार आहेत.
डीबीटी अनिवार्य
बाधित शेतकऱ्यांना वाटप करावयाची मदतीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतर पद्धतीने अर्थात डीबीटीने प्रदान करण्यात येणार आहे. परंतु, एखाद्या व्यक्त ीकडी आधार क्रमांक नसेल, तर अशी व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये म्हणून अन्य पर्यायी व व्यवहार्य ओळखपत्राच्या आधारे ती रक्कम देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल व कृषी विभागाच्या क्षेत्रिय अधिकाºयांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसानप्रकरणी ही मदत अनुज्ञेय राहणार आहे, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
नुकसानभरपाई थेट बँक खात्यात
मदतीची रक्कम संबंधित बाधितांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. कोणत्याही बाधितांना रोख अथवा निविष्ठा स्वरूपात मदत देण्यात येऊ नये, पिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असे कठोर निर्देश आहेत.