पोषण आहारावर अवलोकनार्थ समितीचा वॉच
By Admin | Updated: September 16, 2014 23:26 IST2014-09-16T23:26:51+5:302014-09-16T23:26:51+5:30
शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करत सुरू केलेली शालेय पोषण आहार योजना आवश्यक त्या प्रमाणात गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे शासनाने केलेल्या एका पाहणीत स्पष्ट झाले आहे.

पोषण आहारावर अवलोकनार्थ समितीचा वॉच
अमरावती : शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करत सुरू केलेली शालेय पोषण आहार योजना आवश्यक त्या प्रमाणात गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे शासनाने केलेल्या एका पाहणीत स्पष्ट झाले आहे. त्यानंतर शासनाने याची दाखल घेऊन शासनाने पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी राज्य समीक्षा पथकाची स्थापना केली आहे. त्यामार्फत जिल्ह्यातील शाळामधील आहाराची तपासणी करण्यात येणार आहे त्यामुळे आता पोषण आहारातील गैरप्रकार दूर करून विद्यार्थ्यांपर्यंत आहार पोहचण्यास मदत होणार आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळून त्यांची सर्वांगिन वाढ चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. आहारातून विद्यार्थ्याच्या वाढीसाठी आवश्यक त्या कॅलरीजचा आहार देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर दररोज वेगवेगळ्या पद्धतीचा आहार देण्याचेही ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार शाळेतून आहार दिला जातो. पुरवठा विभागामार्फत शाळांना त्यासाठी तांदूळ आणि शासनाने नेमलेल्या ठेकेदारामार्फत अन्य साहित्य पुरवले जाते. त्यातून शाळांनी नेमलेले स्वयंपाकी आणि मदतनिसांमार्फत आहार तयार करून दिला जातो. शाळेतून दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये सातत्य नसल्याची ओरड होते. त्याच बरोबर दिला जाणारा तांदूळ आणि अन्य साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याचेही आरोप केले जातात. ज्या प्रमाणात आहार शिजवायचा आहे त्या प्रमाणात तो शिजवला जात नाही त्याचबरोबर तो गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचेही शासनाने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. याची दखल घेऊन आहाराच्या तपासणी करण्यासाठी राज्य समिक्षा पथकाची स्थापना केली आहे. या पथकामार्फत शाळांतील आहाराच्या अंमलबजावणी यंत्रणेची व आहाराची तपासणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)