‘एमओएच’साठी आयुक्तांची कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:01 IST2019-12-06T06:00:00+5:302019-12-06T06:01:02+5:30
आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळेच मागील वर्षी शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लूने थैमान घातले. यात डझनावरी नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर कुठे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची पाठवणी करण्यासाठी सरळसेवा पद्धतीने जाहिरात देऊन डॉ. विशाल काळे यांची नियुक्ती करण्यात आली.

‘एमओएच’साठी आयुक्तांची कसोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महिन्याकाठी तीन कोटींवर देयके असणाऱ्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी या मलाईदार पदाच्या प्रभारासाठी महापालिकेत पुन्हा संगीत खुर्ची रंगणार आहे. यासाठीच न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून डॉ. विशाल काळे या अधिकाºयाचा चौकडीने गेम केल्याचा आरोप महापालिका वर्तुळात होत आहे. पुन्हा ‘त्या’ वादग्रस्त अधिकाऱ्याला प्रभार देण्यासाठी सगळा प्रकार महापालिकेत सुरू झाला आहे. त्यामुळेच या सर्व प्रक्रियेत आयुक्त संजय निपाणे यांची कसोटी लागणार आहे.
आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळेच मागील वर्षी शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लूने थैमान घातले. यात डझनावरी नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर कुठे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची पाठवणी करण्यासाठी सरळसेवा पद्धतीने जाहिरात देऊन डॉ. विशाल काळे यांची नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान, डॉ. विशाल काळे यांच्या नियुक्तीला न्यायालयात आव्हान देण्यात आले. मात्र, यामागचा बोलाविता धनी नामनिराळाच राहिला आहे. यामध्ये स्वच्छता कंत्राटामधील काही बड्या कंत्राटदारांसह काही नगरसेवकांची नावे महापालिका वर्तुळात उघडपणे घेतली जात आहेत. आता सुकळीचा २५ कोटींचा प्रकल्प मार्गी लागल्याने केवळ ‘त्या’ प्रभारी अधिकाऱ्यासाठी हा सारा आटापीटा केला जात आहे. अद्याप महापालिका आयुक्त संजय निपाणे याला बळी पडले नसल्याची माहिती आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांच्या सेवासमाप्तीचे आदेश आयुक्त निपाणे यांनी बुधवारी दिलेत. या रिक्त पदासाठी दोन दिवसांत जाहिरात देऊन शक्य तितक्या लवकर या ठिकाणी सरळसेवा पद्धतीने अधिकारी नियुक्त करण्याचा आयुक्तांचा विचार आहे.
दरम्यानच्या काळात पुन्हा ‘त्या’ वादग्रस्त अधिकाऱ्याला प्रभार देण्यासाठीचा घाट महापालिकेतील चौकडीने घातला आहे. मात्र, त्यासाठी दबावाचे राजकारण करून शहराचे आरोग्य धोक्यात आणायचे काय, असा अमरावतीकरांचा आयुक्तांना सवाल आहे.
तिघांमध्ये रंगणार संगीतखुर्ची
वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदाच्या प्रभारासाठी मुख्यालयातील सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजय जाधव, आयसोलेशन रुग्णालयाचे डॉ देवेंद्र गुल्हाने व विलासनगर रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नैताम यांच्यात संगीतखुर्ची रंगणार आहे. यापैकी एका विशिष्ट अधिकाºयासाठी काही पदाधिकाऱ्यांचा दबाव आयुक्तांवर असल्याची माहिती आहे.
पवारांच्या काळात प्रभारीवर धुरा
चंद्रकांत गुडेवार यांनी सरळसेवा पद्धतीने डॉ. रमेश बनसोड यांची नियुक्ती केली होती. मात्र, ते रुजू झाले नाहीत. मात्र, नंतरच्या काळातील प्रक्रियेत त्यांनी विशाल काळे यांच्या नियुक्तीला आव्हान दिले. त्यापूर्वी हेमंत पवार यांनी हे मलाईदार पद प्रभारीकडे ठेवण्यात धन्यता मानली होती. मात्र, विद्यमान आयुक्तांनी डेंग्यू प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर प्रभारींच्या रवानगीसाठी सरळसेवा भरतीची प्रक्रिया राबविली. आता पुन्हा न्यायालयाचय आदेशाने नव्याने प्रक्रिया राबविली जाणार आहे.
ही आहे पदाची पात्रता
वैद्यकशास्त्रातील सार्वजनिक प्रतिबंधात्मक व सामाजिक आरोग्य शाखेची पदव्युत्तर पदवी (एमडी, पीएचएम), शासकीय-निमशासकीय आस्थापनावरील सहायक आरोग्य अधिकारी व तत्सम पदावरील सात वर्षाचा पर्यवेक्षीय व कार्यकारी पदाचा अनुभव तसेच रुग्णालयातील प्रशासन, सार्वजनिक आरोग्य व प्रतिबंधात्मक उपचारात्मक बाबी समर्थपणे हाताळण्याचा व स्वच्छता पर्यवेक्षण, साथ, आजार निमूर्लन कार्यक्रम, हिवताप नियंत्रण आदी कार्याचा सात वर्षांचा अनुभव ही या पदाची किमान अर्हता आहे.