आयुक्तांची दहशत, आरटीओंची पळापळ
By Admin | Updated: February 9, 2015 23:03 IST2015-02-09T23:03:50+5:302015-02-09T23:03:50+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) कारभार दलालांशिवाय चालणे ही सर्वांच्या लेखी जवळपास अशक्यप्राय घटना. मात्र, महेश झगडे यांनी परिवहन आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच

आयुक्तांची दहशत, आरटीओंची पळापळ
चिरीमिरीला लगाम : दलालांची मुस्कटदाबी
अमरावती : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) कारभार दलालांशिवाय चालणे ही सर्वांच्या लेखी जवळपास अशक्यप्राय घटना. मात्र, महेश झगडे यांनी परिवहन आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच आरटीओ कार्यालयांना दलालमुक्त करण्याचा धडाका लावला आहे. याचे परिणाम जिल्ह्यातही जाणवू लागले असून आरटीओ अधिकाऱ्यांची पळापळ सुरु झाली आहे.
आरटीओ कार्यालयांमध्ये दलाल असावेत किंवा नाही, हा विषय राज्यभर चर्चिला जातोय. मात्र, परिवहन आयुक्त झगडे यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याने कोणताच अधिकारी वाहन चालकांकडून चिरीमिरी घेण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या नाक्यांवर वाहनांची कागदपत्रे तपासताना आता केवळ कारवाईचेच उद्दिष्ट असल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे तर वसुलीसाठी नाक्यावर राहणाऱ्या दलालांना अधिकाऱ्यांनी केव्हाच ‘चालते व्हा’ चा निरोप दिला आहे. परिणामी राज्य अथवा राष्ट्रीय महामार्गावर आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीला असलेले दलाल गायब झाले आहेत.
ही सर्व किमया परिवहन आयुक्त झगडे यांची आहे. झगडे यांनी कोणत्याही ठिकाणी आकस्मिक भेट देऊन आरटीओंच्या कारभाराचा पर्दाफाश करण्याचे निर्देशित केल्याने आरटीओ अधिकारी आता नागरिकांची कामे थेट आणि पारदर्शक पध्दतीने करताना दिसून येत आहेत. एरवी चिरिमिरीशिवाय आरटीओ विभागात कामे होत नसल्याची सर्वसामान्यांची ओरड असते. परंतु आता दलालांशिवाय कामे करा, असे सुुखावह वाटणारे फलक आरटीओ कार्यालयात झळकू लागले आहेत. दलालांचा वरचष्मा असणाऱ्या आरटीओ कार्यालयातील बहुतांश खिडक्या अलिकडे ओस पडल्या आहेत. परिवहन आयुक्तांच्या दहशतीत अधिकारी कामकाज करीत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)