मेळघाटातील आश्रम शाळांवर आयुक्तांच्या धाडी
By Admin | Updated: September 29, 2015 01:39 IST2015-09-29T01:39:41+5:302015-09-29T01:39:41+5:30
आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया आणखी मजबूत करण्याची गरज असून शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व

मेळघाटातील आश्रम शाळांवर आयुक्तांच्या धाडी
अचलपूर : आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया आणखी मजबूत करण्याची गरज असून शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी-सुविधा पुरविण्यासाठी आदिवासी विभाग कटीबध्द आहे. उच्चप्रतिचे शिक्षण देण्यासाठी निवासी अनुदानीत व शासकीय आश्रमशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करुन मोठे व्हा, असा सल्ला राज्याच्या आदिवासी आयुक्त सोनाली पोंक्षे (वायंगणकर) यांनी म्हसोना येथील गुरुदेव आदिवासी अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना सोमवारी दिला.
यावेळी त्यांच्या समवेत उपायुक्त एम.जी.गायकवाड, ए.आर.खेतमाळोस, अप्पर आयुक्त आत्राम, सहआयुक्त ए.के.जाधव, प्रकल्प अधिकारी रमेश मवासी आदी उपस्थित होते.
म्हसोना आश्रमशाळेत अचानक आदिवासी आयुक्तांच्या गाड्यांचा ताफा धडकताच खळबळ उडाली. विद्यार्थी वर्गात उपस्थित होते. आयुक्तांनी थेट वर्गखोलीत शिरुन विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. मात्र, विद्यार्थ्यांना उत्तरे देता आली नाहीत.
शिक्षकांची घेतली हजेरी : म्हसोना आश्रम शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक आढळल्यावर आयुक्तांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावून घेतले. शिक्षकांचे हजेरी पत्रक स्वत: घेवून प्रत्येक शिक्षकांची हजेरी घेतली.
धान्य मोजले : निवासी विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी शासनातर्फे धान्य पुरवठा केला जातो. म्हसोना येथे पहिली ते बारावीपर्यंत वर्ग असून ७४२ विद्यार्थी येथे निवासी आहेत. त्यांना लागणारा धान्यसाठा योग्य आहे किंवा नाही, याची तपासणी त्यांनी स्वत: केली. तर जुन्या गव्हाला सोंडे लागल्याने ते स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या.
मेळघाटातील अनुदानित व शासकीय आश्रम शाळांची तपासणी दोन दिवस करणार आहोेत. अनुदानित शाळेला भेट दिल्यावर आमच्या शासकीय शाळांची स्थिती प्रत्यक्ष जाणून घेवून, शासन कुठे कमी पडते, हे जाणून घेतले आहे.
- सोनाली पोंक्षे वायगणकर,
आदिवासी आयुक्त, नाशिक