येत्या वर्षात प्रवाशांसाठी खुशखबर, ‘शिवशाहीत’ मिळणार मोफत वायफाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 17:40 IST2017-12-27T17:39:12+5:302017-12-27T17:40:09+5:30
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवशाही या नव्याने दाखल झालेल्या वातानुकूलित बसमध्ये इंटरनेट वायफाय बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्व शिवशाहींमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांना नवीन वर्षात वायफाय सुविधा मोफत दिली जाणार आहे.

येत्या वर्षात प्रवाशांसाठी खुशखबर, ‘शिवशाहीत’ मिळणार मोफत वायफाय
- जितेंद्र दखने
अमरावती : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवशाही या नव्याने दाखल झालेल्या वातानुकूलित बसमध्ये इंटरनेट वायफाय बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्व शिवशाहींमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांना नवीन वर्षात वायफाय सुविधा मोफत दिली जाणार आहे.
येत्या मार्च ते एप्रिल महिन्यापासून वायफाय बसविण्यात येणार आहे. त्यामुळे मनोरंजनासह अन्य संकेतस्थळांनाही भेटी देता येणार असून, प्रवाशांचा कंटाळवाणा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.
इंटरनेट ही सध्या काळाची मूलभूत गरज बनली असल्याचे ओळखूनच शिवशाहीमध्ये वायफाय बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये २०० शिवशाही बसेसमध्ये वायफाय सुविधा सुरू होणार आहे. ज्या कंपनीकडून शिवशाहीच्या बस भाडे तत्त्वावर घेण्यात आल्या आहेत, त्या कंपनीकडूनच वायफाय सेवा उपलब्ध केली जाणार आहे. वायफायच्या देखभाल-दुरुस्तीची सर्व जबाबदारी कंपनीवरच राहील, असेही सांगण्यात आले.
शिवशाहीतील चालकाच्या पाठीमागे एक कंपार्टमेन्ट (निराळा भाग) तयार करण्यात येणार असून त्यामध्ये राउटर, दोन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सीटच्या पुढील बाजूस वायफाय कसा वापरावा, याची माहिती दिली जाईल. त्यावर वायफायचा पासवर्ड लिहिण्यात येईल. तो पासवर्ड प्रवाशाने आपल्या मोबाईलवर टाकल्यानंतर त्याला मोफत इंटरनेट सुविधेचा लाभ प्रवासादरम्यान घेता येणार आहे.