अचलपुरात दीड हेक्टर क्षेत्रावर रंगीत कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST2019-12-15T06:00:00+5:302019-12-15T06:00:41+5:30

नागपूरच्या केंद्रीय कापूस (सीआयसीआर) संशोधन केंद्राने रायमंडी आणि थरबेरी या जंगली कापसाच्या प्रजातींचे मिश्रण करून हे बियाणे विकसित केले. या केंद्राकडे राष्ट्रीय जीन बँक अंतर्गत जवळपास ५० प्रकारच्या रंगीत कापसाचा जनुकीय संग्रह आहे.

Colored cotton on a half hectare area in Achalpur | अचलपुरात दीड हेक्टर क्षेत्रावर रंगीत कापूस

अचलपुरात दीड हेक्टर क्षेत्रावर रंगीत कापूस

ठळक मुद्देकेंद्रीय कापूस संशोधन केंद्र। डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे योगदान

अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अचलपूर कृषिसंशोधन केंद्रावरील दीड हेक्टर क्षेत्रावर रंगीत कापूस बियाण्याची लागवड करण्यात आली. आता या पऱ्हाटीवरील फुटलेल्या बोंडातून खाकी रंगाचा कापूस बाहेर आला आहे.
अचलपूर कृषिसंशोधन केंद्रावर रंगीत कापसाचा हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. राज्यातीलही हा पहिलाच प्रयोग आहे. याकरिता ‘वैदेही-९५’ नामक कापूस बियाणे जून-जुलैमध्ये अचलपुरात लावले गेले. हा रंगीत कापूस केंद्रीय कापूस तंत्रज्ञान (सिरकॉट) ला पाठविला जाणार आहे. यातून नैसर्गिक रंगीत कापड निर्मिती केली जाणार आहे. यास आंतरराष्ट्रीय स्तरावर वाव असल्यामुळे तसा ब्रँड विकसित करण्याचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा प्रयत्न आहे. याकरिता कृषी विद्यापीठानेही स्वत: आपल्याकडे ५० एकरावर रंगीत कापसाची पेरणी केली.
नागपूरच्या केंद्रीय कापूस (सीआयसीआर) संशोधन केंद्राने रायमंडी आणि थरबेरी या जंगली कापसाच्या प्रजातींचे मिश्रण करून हे बियाणे विकसित केले. या केंद्राकडे राष्ट्रीय जीन बँक अंतर्गत जवळपास ५० प्रकारच्या रंगीत कापसाचा जनुकीय संग्रह आहे.
विद्यापीठाचे तत्कालीन कापूस संशोधक एल.डी. मेश्राम यांनी जंगली कापूस जातीवर संशोधन करून खाकी, तपकिरी रंगाची कापूस निर्मिती केली होती. त्यानंतर हे संशोधन मागे पडले असले तरी कृषी विद्यापीठाने परिपूर्ण जनुकीय संग्रह केला आहे.

नैसर्गिक रंगीत कापसाला भारत, इजिप्त आणि दक्षिण अमेरिकेत पाच हजार वर्षांचा इतिहास आहे. या रंगीत नैसर्गिक कापसात पिवळट तपकिरी, तपकिरी, करडा-राखाडी, खाकी आणि हिरव्या रंगाची नोंद आहे. मोहेंजोदरो आणि हडप्पामधील आर्यांनी तीन हजार वर्षांपूर्वी इंडो-पाक क्षेत्रात रंगीत कापसाची शेती केली. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात तपकिरी (ब्राऊन) रंगाच्या कापसाचे उत्पादन आंध्र प्रदेशात घेतले गेले. हा कापूस त्याकाळी जपानला निर्यात केला गेला.

Web Title: Colored cotton on a half hectare area in Achalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस