महाविद्यालयस्तरीय प्राध्यापक ‘समन्वयक’ गुंडाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:34 IST2020-12-04T04:34:12+5:302020-12-04T04:34:12+5:30
अमरावती : कोणत्याही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कामांसाठी विद्यापीठात येऊ नये, यासाठी महाविद्यालय स्तरावर प्राध्यापकांची ‘समन्वयक’ म्हणून नियुक्तीचा निर्णय संत ...

महाविद्यालयस्तरीय प्राध्यापक ‘समन्वयक’ गुंडाळले
अमरावती : कोणत्याही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कामांसाठी विद्यापीठात येऊ नये, यासाठी महाविद्यालय
स्तरावर प्राध्यापकांची ‘समन्वयक’ म्हणून नियुक्तीचा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून घेण्यात आला. मात्र, या उपक्रमाला महाविद्यालयांनी योग्य प्रतिसाद दिला नाही.
अखेर तीन वर्षांतच हा उपक्रम गुंडाळावा लागला, समन्वयक पद कायम असते तर हल्ली ‘विथहेल्ड’ निकालासाठी विद्यार्थ्यांची होत असलेली गर्दी रोखता आली असती, असे बोलले जात आहे.
गाव, खेड्यांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती, प्रवेश अथवा पदवी संदर्भात विद्यापीठात येण्याची गरज पडू नये, यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी एका प्राध्यापकांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय विद्यापीठाने अधिसूचना क्रमांक १४१/२०१५ अन्वये घेतला.
त्याकरिता संबंधित प्राध्यापकाला वर्षाकाठी पाच हजार रुपये मानधन देण्यात आले. या उपक्रमाची निदेश क्रमांक २९ सप्टेंबर २०१५ नुसार अंमलबजावणी सुरू झाली. सन २०१५ ते २०१८ या तीन वर्षांत महाविद्यालयांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. विद्यापीठ अंतर्गत ४१० पैकी २६६ महाविद्यालयांनीच प्राध्यापकांची ‘समन्वयक’पदी नियुक्ती केली होती. प्राचार्यांच्या कार्यपूर्ती अहवालाच्या आधारे विद्यापीठाने प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे मानधनदेखील अदा केले आहे. परंतु, विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामे महाविद्यालय स्तरावर होण्याऐवजी स्वत: विद्यार्थी विद्यापीठात येत होते. ज्या हेतुने प्राध्यापकांची ‘समन्वयक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली तो हेतू साध्य होत नसल्याने १४ मे २०१९ रोजी व्यवस्थापन समितीने हा उपक्रम गुंडाळण्याचा निर्णय घेतला.
--------------------
कार्यपूर्ती अहवालाच्या आधारे प्राध्यापक नियुक्त ‘समन्वयक’ यांना वर्षाचे पाच हजार रुपये मानधन देण्यात आले. मात्र, या उपक्रमाचा फारसा लाभ झाला नाही. जी कामे प्राध्यापकांनी करणे अपेक्षित होते, ती कामे स्वत: विद्यार्थी विद्यापीठात घेऊन यायचे. त्यामुळे हा उपक्रम बंद करण्यात आला.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.
-------------------------
विद्यार्थी हिताकडे महाविद्यालयांचे दुर्लक्ष
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कामांसाठी विद्यापीठात येऊ नये, हा उपक्रम अतिशय चांगला होता. मात्र, कॉलेज स्तरावर विद्यार्थी हिताकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे, हे यावरून स्पष्ट होते. सोमवारपासून ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी १०० ते १५० कि.मी. अंतर ओलांडून विद्यार्थी विद्यापीठ गाठत आहे. आज प्राध्यापक समन्वयक असते तर हा प्रश्न ते सोडवू शकले असते, अशा विद्यार्थ्यांच्या सूचक प्रतिक्रिया आहेत.