जिल्हाधिकारी कार्यालय, बेमुदत संपाचा 8 वा दिवस; आठव्याही दिवशी कामबंद ; आज निघणार तोडगा
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 22, 2024 15:29 IST2024-07-22T15:27:46+5:302024-07-22T15:29:32+5:30
महसूल कर्मचारी संपावर : संघटनेच्या पदाधिकाऱ्याशी मंगळवारी होणार चर्चा

Collector's office, 8th day of indefinite strike; The solution will come out today
अमरावती : जिल्ह्यातील ७८२ कर्मचाऱ्यांचे १५ जुलैपासून कामबंद आंदोलन सुरु असल्याने महसूल विभागाचे काम ढेपाळले आहे. शासनस्तरावरुन मंगळवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा होणार आहे. त्यामध्ये तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रलंबित विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेद्वारा कालबद्ध आंदोलन करण्यात आले. यानंतरही शासनाने मागण्या मान्य न केल्यामुळे जिल्हाध्यक्ष ब्रिजेश वस्तांनी यांच्या नेतृत्वात सोमवार १५ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे सर्व तहसील कार्यालये, एसडीओ, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे.
दरम्यान शासनाद्वारा कर्मचाऱ्यांना पत्र देऊन दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू कर्मचारी आंदोलनावर ठाम राहीले आहे. त्यामुळे मंगळवारी शासनाद्वारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठक व चर्चेसाठी बोलाविण्यात आले. यामध्ये संघटनेचे पाच पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री व महसूलमंत्री संघटनेच्या मागण्यांसंदर्भात ठोस भूमिका व निर्णय घेतील अशी आशा पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.