जिल्हाधिकारी घेणार निर्णय
By Admin | Updated: June 4, 2017 00:04 IST2017-06-04T00:02:44+5:302017-06-04T00:04:15+5:30
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कोकर्डा येथील दारू दुकान बंद व्हावे, यासाठी शनिवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी घेणार निर्णय
दारू दुकान बंदसाठी महिलांचा ठिय्या : कोरमअभावी विशेष ग्रामसभा रद्द
चेतन घोगरे । लोकमत न्यूज नेटवर्क
कोकर्डा : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कोकर्डा येथील दारू दुकान बंद व्हावे, यासाठी शनिवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेला महिलांची ५० टक्के उपस्थिती आवश्यक होती. कोरम पूर्ण झाला नसल्याने दारू दुकान बंद व्हावे, अशी मागणी करणाऱ्या महिलांची निराशा झाली. दारू दुकान बंद करण्याचा निर्णय होणार नाही तोवर जागा सोडणार नाही, अशी भूमिका महिलांनी घेतल्याने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी या दुकानावरील निर्णय राखून ठेवला आहे.
कोकर्डा येथील मुख्य चौकात असलेले दारूचे दुकान बंद व्हावे, यासाठी नजीकच्या शेंडगाव, खासपूर व आसपासच्या गावातील महिलांनी २२ मे रोजी आंदोलन पुकारले होते.
वृद्ध महिलांपासून सुरूवात
कोकर्डा : याचवेळी दारू दुकान बंद करण्यात यावे, यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायतीने ठराव पारित करावा, अशाही सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शनिवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेची वेळ सकाळी आठ वाजताची होती. सकाळ पासूनच महिलांनी ग्रामसभेसाठी लावण्यात आलेल्या मंडपात हजेरी लावली. गावतील वयोवृद्ध महिला सुरुवातील आल्या. हळूहळू महिलांची संख्या वाढत गेली.
मतदार महिलांची संख्या १३१६ असल्याने कोरम पूर्ण करण्यासाठी ६५८ महिलांची उपस्थिती गरजेची होती. मात्र सायंकाळी चार वाजेपर्यंत ५५० महिलांनी हजेरी लावली. अखेर कोरमपूर्ण झाला नसल्याने विशेष ग्रामसभा रद्द करण्यात येत असल्याने ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच दादाराव खंडारे यांनी जाहीर केले. महिलांनी दारू दुकान बंद होणार नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाही, असा पावित्रा घेतला.
ग्रामसभेचे फलित काय ?
दारू दुकान बंद करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असल्याने विशेष ग्रामसभा घेण्यात आली. ‘बाटली आडवी व्हावी’ यासाठी आसपासच्या गावातील महिला जागर करीत होत्या. कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून ग्रामसभेच्या सर्व कागदपत्रांची सत्यता तपासल्यानंतरच निर्णय जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत दारू दुकान बंद राहणार आहे. कोकर्डा येथील दारू दुकानावर ३ जूनपर्यंत बंदी घालण्यात आली होती. मात्र, हे दुकान आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानेच सुरू होणार आहे. यामुळे सर्वांचे लक्ष जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या निर्णयाकडे लागले आहे.
ग्रामसभेला महिलांनी हजेरी लावली, मात्र नोंदणीची वही एकच असल्यामुळे अनेक महिला नोंदणी न करता निधून गेल्यात. आता जिल्हाधिकारी योग्य निर्णय घेतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
- नयना कडू, आंदोलक