वरुड येथे पाच हजार रक्तपिशव्यांचे संकलन
By Admin | Updated: December 17, 2015 00:26 IST2015-12-17T00:26:57+5:302015-12-17T00:26:57+5:30
लोकसेवा : ग्रामीण रूग्णालय संलग्न रक्तदाता संघाने वाचविले अनेकांचे प्राण

वरुड येथे पाच हजार रक्तपिशव्यांचे संकलन
लोकसेवा : ग्रामीण रूग्णालय संलग्न रक्तदाता संघाने वाचविले अनेकांचे प्राण
वरुड : गोरगरीब रुग्णांची रक्तासाठी ससेहोलपट होत असल्याने १ जानेवारी २०१५ ला ग्रामीण रुग्णालयामार्फत रक्तदाता संघ स्थापन केला. या संघाने वर्षभरात तब्बल ८५ रक्तदान शिबिरे आयोजित करून पाच हजार एक रक्तपिशव्या संकलित केल्या आहेत. रक्तदाता संघांतर्गत गरजू आणि गोरगरीब रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करुन शेकडो रुग्णांचे प्राण वाचविले. मोफत रक्तपुरवठा करणारा वरुडचा रक्तदाता संघ राज्यात अव्वल ठरला आहे.
रक्ताची प्रत्येकाला गरज भासते. परंतु मानवाने मोफत रक्तदान करुन दिलेले रक्त रुग्णांना विकत घ्यावे लागते. गोरगरीबांना आर्थिक अडचणीमुळे रक्त विकत घेणे शक्य होत नव्हते. केवळ रक्तामुळे अनेकांचे प्राण गेले. जीवन अनमोल असल्याने मानवाचे प्राण वाचले पाहिजे आणि मोफत रक्तपुरवठा झाला पाहिजे, या दृष्टीने वरुडच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार यांनी सामाजिक कार्यकर्त्यांसोबत या समस्येबाबत चर्चा केली. त्यानंतर १ जानेवारी २०१५ रोजी वरुडमध्ये ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघाची स्थापना केली. जानेवारीपासून डिसेंबर २०१५ पर्यंत ८५ रक्तदान शिबिरे घेवून पाच हजार एक रक्तपिशव्यांचे संकलन केले. या रक्तदाता संघाने नागपूर, अमरावती वरुड, मोर्शी तालुक्यातील रुग्णांना रक्तपुरवठा करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाची रक्तपेढी तसेच नागपूरच्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सहकायाने हा उपक्रम सुरु केला. दोन्ही रक्तपेढी अंतर्गत शासन निर्णयानुसार आणि शासनाच्या अटी व नियंमाना अधिन राहून मोफत रक्तपुरवठा करण्यात येतो. रक्तदानासाठी सेवाभावी विविध संस्था, मंडळे , शासकिय कार्यालये, राजकिय पक्ष, संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळत आहे. या माध्यमातून शिबिरांचे आयोजन करुन रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करण्याची संकल्पना सुरु केली. सेवाभावी रक्तदात्यांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला. या रक्तदाता संघामार्फत संकलित केलेले रक्त जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पुरविण्यात येते. यामुळे आजवर अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होते. या स्तुत्य उपक्रमाची अनेकांनी दखल घेऊन या कार्यात सहकार्य केले आहे.
रक्तदाता संघ वरुडने नागपूरच्या कोणत्याही रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांसाठी मोफत रक्तपुरवठयाची सोय व्हावी म्हणून नागपूरच्या हेडगेवार रक्तपेढीसोबत लेखी करार केला आहे. या माध्यमातून नागपुरात सुध्दा मोफत रक्ताची सुविधा उपलब्ध केली आहे. जिल्हयात एकमेव मोफत रक्तपुरवठा करण्याचा संकल्प करणारी सेवाभावी संस्था म्हणून या रक्तदाता संघाने उत्तुंग भरारी घेतली आहे. या रक्तदाता संघाला राजाश्रयाची गरज असून शासनकर्त्यांनी सुध्दा सहकार्य केल्यास वरुडला शासकीय रक्तपेढी स्थापन होऊ शकते. ही उणीव भरुन काढण्यासाठी रक्तदाता संघाच्यावतीने पालकमंत्री प्रवीण पोटे, आ.अनिल बोंडे यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. ग्रामीण रुग्णालयाशी संलग्न रक्तदाता संघाला आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे, जिल्हा शल्य चिकित्सक राऊत, रक्तपेढीचे जाधव, सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल अमरावतीचे वैद्यकीय अधीक्षक शामसुंदर निकम, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक प्रमोद पोतदार, अशोक पत्कींसह संचालक मंडळाचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. रक्तदाता संघाच्या माध्यमातून आजवर अनेक गोरगरीब रूग्णांचे प्राण वाचले आहेत. हा प्रवास अविरत सुरू आहे.
रक्तदाता संघाची उभारणी गरजू रुग्णांना मोफत रक्त देण्यासाठी करण्यात आली. मानवाचे रक्त हे केवळ ३३ दिवसच राहू शकते. चक्राकार पध्दतीने रक्तदान शिबीर आयोजित करणे गरजे असते. यासाठी रक्तदान शिबिर घेण्यासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षित असल्याने रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासाठी शासकिय कार्यालयाचे प्रमुख , सेवाभावी संस्था, उत्सव समित्या, मंडळे, सर्व जातीधर्माच्या नागरीकांनी सहकार्य करुन सहकार्य कराव े.
- प्रमोद पोतदार, कोषाध्यक्ष, रक्तदाता संघ
रक्तदानाविषयी जनजागृतीसाठी
विवाह सोहळा
रक्तदानाबाबत नागरिक, तरुणांंमध्ये जनजागृती व्हावी याकरिता ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघाने गत मे महिन्यात पुसला येथे विवाह सोहळ्यात आणि जरुडला वाढदिवसात जनजागृती करण्यासाठी अमरावती येथील बियाणी महाविद्यालयात आणि बजरंग गणेश मंडळानेही रक्तदान शिबिर घेतले.