वरुडच्या रक्तदाता संघाने केले ३ हजार २०० रक्तपिशव्यांचे संकलन !
By Admin | Updated: September 12, 2015 00:19 IST2015-09-12T00:19:19+5:302015-09-12T00:19:19+5:30
गोरगरिबांना महागडे रक्त विकत घेऊन रुग्णंना देणे शक्य होत नाही. परंतु वरुड मध्ये ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार आणि सचिव चरण सोनारे ..

वरुडच्या रक्तदाता संघाने केले ३ हजार २०० रक्तपिशव्यांचे संकलन !
वाढता लोकसहभाग : आठ महिन्यात ५२ शिबिरे
वरुड : गोरगरिबांना महागडे रक्त विकत घेऊन रुग्णंना देणे शक्य होत नाही. परंतु वरुड मध्ये ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार आणि सचिव चरण सोनारे यांना रक्तपुरवठा करून रुग्णांचे प्राण वाचविण्यास मोठ्या प्रमाणावर झालेला त्रास आणि गोरगरीब रुग्णांची रक्तासाठी होणारी ससेहोलपट पाहता, १ जानेवारी २०१५ ला ग्रामीण रुग्णालय संलग्नीत रक्तदाता संघ स्थापन केला. आठ महिन्यांत तब्बल ५२ रक्तदान शिबिरे आणि ३ हजार २०० रक्तपिशव्या संकलीत करण्यात आल्या.
रक्तसंकलन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची रक्तपेढी तसेच नागपूरच्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सहकार्य मिळत आहे. रुग्ण अमरावती, नागपुरला सुध्दा उपचाराकरीता दाखल असल्यास या दोन्ही रक्तपेढी अंतर्गत शासन निर्णयानुसार आणि शासनाच्या अटी व नियंमाना अधिन राहून मोफत रक्तपुरवठा करण्यात येतो. रक्तदान शिबिरे घेण्याकरिता सेवाभावी विविध संस्था, मंडळे, शासकीय कार्यालये, राजकीय पक्ष, संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य मिळत असल्याने मोठी उभारी या रक्तदाता संघाला मिळाली आहे. या माध्यमातून आयोजन करून रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्याची संकल्पना अविरत सुरू केली. परिसरातील सेवाभावी नागरिक तसेच रक्तदात्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदाता संघामार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे सुरू केले आहे. वरुड तालुक्यातून संकलित झालेले रक्त जिल्हा सामान्य रुग्णालयात देऊन मानवतेचा परिचय दिला जात आहे. तर हेच रक्त जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पुरविण्यात येऊन रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होते. या स्तृत्य उपक्रमाची अनेकांनी दखल घेऊन या कार्याला सहकार्य केले आहे.