आचारसंहिता उल्लंघन अजामीनपात्र गुन्हे
By Admin | Updated: December 28, 2016 01:42 IST2016-12-28T01:42:47+5:302016-12-28T01:42:47+5:30
नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये २८ उमेदवारांना कोणतीही नोटीस न देता अथवा खुलासा न विचारता

आचारसंहिता उल्लंघन अजामीनपात्र गुन्हे
ठाण्याचे समजपत्र : न्यायालयाकडून तत्काळ जामीन मंजूर
अंजनगाव सुर्जी : नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये २८ उमेदवारांना कोणतीही नोटीस न देता अथवा खुलासा न विचारता त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश विनोद बनसोड यांच्या न्यायालयाने मात्र बहुतांश उमेदवारांना तत्काळ जामीन मंजूर केला. स्थानिक पोलीस स्टेशनने उमेदवारांना समजपत्र देऊन आरोपपत्र दाखल केले होते.
काँग्रेसचे उमेदवार गिरीश लोकरे, गुलजारपुरा यांना मात्र रात्रभर पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. संपूर्ण प्रकरणात कायद्याचा अवाजवी दुरूपयोग करून व्यक्ती स्वातंत्र्य हिरावण्यात आल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. सर्वात महत्त्वाचे असे की, गुन्हा दाखल असल्याचे व ठाण्यात जमानत मिळणार नाही, असे तोंडी निरोप देऊन त्यांना बजावण्यात आले. निवडणूक आयोगातर्फे अथवा पोलीस ठाण्यातर्फे कोणतीही नोटीस या संबंधात देण्यात आलेली नाही.
पोलीस विभागाच्या आरोपपत्रानुसार असे दिसून येते की, आचारसंहितेचे पालन योग्य रितीने होते की नाही याची पाहणी करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी पथक तयार केले होते. या पथकात पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक गजानन चांभारे, नगर परिषदेचे कर निरीक्षक सागर बोबडे व महसूल विभागाचे मंडळ अधिकारी राजेश मिरगे यांचा समावेश होता. या पथकाने गावातील टेलीफोन/इलेक्ट्रिक खांब व सार्वजनिक जागी लावलेल्या प्रचार फलकांचा पंचनामा करून पोलीस ठाण्याला अहवाल दिला. त्यानुसार भादंविचे कलम १८८ प्रशासकीय अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशाची अवज्ञा होईल, असे कृत्य करणे या जामीनपात्र गुन्ह्यासह सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याचे कलम ३ हे अजामीन पात्र कलम लावण्यात आले.
वास्तविक कोणत्याच उमेदवाराने टेलीफोन/इलेक्ट्रिक पोल विद्रुप केला नाही अथवा संबंधित खात्यातर्फेसुद्धा अशी कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.
गुन्हे दाखल केल्यानंतर उमेदवारांना पोलीस शिपायांमार्फत निरोप देण्यात आले. साहेबांनी बोलाविले, जमानत होणार नाही, असे सूचक निरोप दिले. मात्र कोणतीही लेखी नोटीस देण्यात आलेली नाही. गिरीश लोकरे या उमेदवाराला तर रात्रभर पोलीस कोठडीत ठेवून त्याच्यावर एल. सी. बी. कोर्ट अमरावती येथेसुद्धा कार्यवाही करण्यात आली.
जामीनपात्र गुन्ह्यात अजामीनपात्र गुन्ह्याचे कलम वापरून पोलीस ठाण्यातर्फे कायद्याचा अवाजवी वापर केल्याचा आरोप अनेक उमेदवारांनी केला आहे. ज्या उमेदवारांनी ठाणेदार पाटील यांना याबाबत विचारणा केली त्यांना ठाणेदार पाटील यांनी अपमानास्पद वागणूक देऊन पोलीस कोठडीत टाकण्याची धमकीसुद्धा दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)
कायद्यानुसार कार्यवाही केली : सुधीर पाटील
सदर प्रकरणात आचारसंहिता देखरेख पथकाने दिलेल्या अहवालानुसार कायदेशीर कार्यवाही केली आहे. पोलीस ठाण्याची कोणतीही भूमिका नाही. संपूर्ण प्रकरण निवडणूक आयोगाने तयार केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनानुसार कार्यवाही करण्यात आल्याचे सुधीर पाटील म्हणाले.