जिल्हा परिषदेसाठी ५ ते ७ जानेवारीपासून आचारसंहिता !
By Admin | Updated: December 30, 2016 00:58 IST2016-12-30T00:58:31+5:302016-12-30T00:58:31+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितींचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे. सध्या मतदार यादीचा

जिल्हा परिषदेसाठी ५ ते ७ जानेवारीपासून आचारसंहिता !
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : प्रशासनाची लगबग, बैठकीचा धमाका
अमरावती : जिल्हा परिषद व पंचायत समितींचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे. सध्या मतदार यादीचा कार्यक्रम सुरू आहे.
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याच्या दुसऱ्या दिवशी नामनिर्देशन अर्जाची प्रक्रिया साधारणपणे सुरू होते व त्याच्या काही दिवसांपूर्वी निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची लगबग सुरू आहे. सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान होण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी वर्तविली आहे.
जिल्हा परिषदेचा कालावधी १९ मार्च २०१७ रोजी संपत आहे. चांदूररेल्वे, तिवसा व धामणगाव वगळता उर्वरित १० पंचायत समितींचा कालावधी १३ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येत आहे.
त्याच्या दोन महिन्यापूर्वी सार्वत्रिक निवडणुका जाहीर होतात. यापूर्वी सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुका पूर्व ९ जानेवारीला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली व १७ जानेवारी २०१२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर १८ जानेवारीपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. निवडणुकीची घोषणाही ३ जानेवारी २०१२ ला झाली होती.
या पार्श्वभूमीवर यंदा १२ जानेवारीला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होत आहे. त्यावर १७ जानेवारीपर्यंत हरकती, आक्षेप मागविले आहे व २१ जानेवारीला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या दिनांकानंतर लगेच निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे व याचे १० ते १२ दिवसांपूर्वी निवडणुकीची घोषणा आयोगाद्वारा होण्याची शक्यता आहे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्यासोबत महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होईल, अशी शक्यता आहे. त्याच दिनांकांपासून आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे प्रशासनाची लगबग वाढली आहे. (प्रतिनिधी)
महसूलमंत्र्यांचे सूचक वक्तव्य
जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकांमध्ये ७ जानेवारी २०१७ पासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याचे सूचक वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी कोल्हापूर येथील कार्यक्रमात केले. या सर्व निवडणुका यावेळी एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान आयोागद्वारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.