६ जानेवारीला आचारसंहिता ?
By Admin | Updated: January 5, 2017 00:20 IST2017-01-05T00:20:20+5:302017-01-05T00:20:20+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रतीक्षा आहे. आचारसंहिता कधी लागू होते, याची वाट पाहणे सुरु आहे.

६ जानेवारीला आचारसंहिता ?
झेडपीचा रणसंग्राम : नेत्यांना भूमिपूजनाची लगीनघाई
अमरावती : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रतीक्षा आहे. आचारसंहिता कधी लागू होते, याची वाट पाहणे सुरु आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शासकीय निधीतून विकास कामांचे भूमिपूजन आटोपले पाहिजे, अशी घाई मंत्री, आमदारांकडून सुरु आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा ताण वाढला आहे. बहुप्रतिक्षीत आचारसंहिता ६ किंवा ७ जानेवारी रोजी लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या तारखा लक्षात घेऊन प्रशासकीय पातळीवर कामे मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहे.
अमरावती जिल्हा परिषदेसाठी ५९ मतदारसंघ आहेत तर पंचायत समितीचे दुप्पट म्हणजे ११८ मतदार संघ आहेत. यापैकी सध्या ८८ ठिकाणीच निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषदेची मुदत मार्च महिन्यात संपत आहे. या मुदतीपूर्वी नवीन जिल्हा परिषद अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषदेची सर्वसामान्य सभा घेण्यात आली. ही विशेष सर्वसाधारण सभा शेवटची ठरण्याची शक्यता आहे. या सर्व साधारण सभेपासून जिल्हा परिषदेच्या बहुतां सदस्य मिनीमंत्रालयात ये-जा करणे बंद आहे. केवळ अडलेली कामे निकामी काढण्यासाठी सदस्य जिल्हा परिषदेत धाव घेत आहेत. उर्वरित सर्व वेळ आपापल्या मतदार संघाला देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य मतदारसंघातील विकासकामे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून ग्रामीण भागात विकासकामांचे भूमिपूजन सुरु आहे. आमदारांनी भूमिपूजनाचा सपाटा लावला आहे. रस्ते, नालीचे बांधकाम, डांबरीकरण, रस्त्याचे काँक्रीटीकरण आदींचे भूमिपूजन सुरु आहे.
२१ जानेवारीला मतदार यादीचे प्रकाशन
जिल्हा परिषदेच्या ५९ मतदर संघामध्ये १३ लाखांवर मतदार आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने मतदार यादी पुर्ननिरिक्षण कार्यक्रम राबविला. त्यामध्ये नवीन मतदारांची नोंदणी आणि घर सोडून गेलेल्या मतदारांची नावे कमी करण्यात आली. मतदारांची निवडणूकपूर्व अंतिम यादी २१ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात येत आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरणे सुरु होणार आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
६ व ७ जानेवारीला निवडणूक कार्यक्रमाची घोषणा
६ जानेवारीपूर्वी विकासकामांचे भूमिपूजन किंवा उद्घाटन कार्यक्रमांवर भर देण्यात येत आहे. तसेच सार्वत्रिक बांधकाम विभागाच्यावतीने ग्रामीण भागातील रस्त्यांची कामेदेखील ५ जानेवारीपर्यंत कार्यारंभादेशार्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाची लगबग लक्षात घेता जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रमाची घोषणा ६ किंवा ७ जानेवारी रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.