डोमी, मोझरीच्या विद्यार्थ्यांशी कोरकूतून हितगूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2016 00:18 IST2016-06-29T00:18:34+5:302016-06-29T00:18:34+5:30

चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोमी आणि मोझरी या दोन्ही शाळा अतिदुर्गम भागात आहेत.

Coconut Hughes with domi, Mozery students | डोमी, मोझरीच्या विद्यार्थ्यांशी कोरकूतून हितगूज

डोमी, मोझरीच्या विद्यार्थ्यांशी कोरकूतून हितगूज

शाळेच्या प्रगतीचा घेतला आढावा : शिक्षणमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग
अमरावती : चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोमी आणि मोझरी या दोन्ही शाळा अतिदुर्गम भागात आहेत. अतिदुर्गम भागातील या दोन्ही गावात शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या तसेच शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी आहेत. या दोन्ही शाळेंनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत ज्ञानरचनावाद या अध्यापन पद्धतीचा चांगला अवंलब करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी शंभर टक्के उच्चांकावर नेली आहे.
सोमवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या दोन्ही प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला. यावेळी शिक्षण मंत्र्यांनी १ ते ४ मधील विद्यार्थ्याना सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न, शैक्षणिक साहित्य, स्वच्छता गृह, विद्यार्थ्यांची उपस्थिती-पटसंख्या, शिक्षकांची शिकविण्याची पद्धती, मध्यान्ह भोजन-खिचडी, शाळा आवडते का, शाळेचे गुरुजी तुम्हाला आवडतात का आदी विचारलेल्या प्रश्नांवर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली. यावेळी त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत कोरकु भाषेतूनसुद्धा संवाद साधला. मुळात आदिवासी अतिदुर्गम भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांची अचूक उत्तरे ऐकून मंत्र्यांनी समाधान व्यक्त करीन कौतुक केले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांर्तगत ज्ञानरचनावाद या अध्यापन पद्धतीमध्ये प्रत्यक्ष शैक्षणिक साहित्याच्या मदतीने विद्यार्थी कृती करतात व शिकतात. ज्ञानरचनावाद या अध्यापन पद्धतीचा अवलंब करून डोमी व मोझरी प्राथमिक शाळेंनी उच्चतम शंभर टक्के प्रगती केल्यामुळे या शाळेंची निवड करण्यात आली. या पध्दतीचा अवलंब चिखलदरा तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या १६८ शाळांपैकी १५२ शाळांमध्ये केला जातो. मागील सत्रात या अध्यापन पद्धतीमुळे एकूण २२ शाळांतील शंभर टक्के विद्यार्थी प्रगत झाले आहेत. चालू सत्रात सुद्धा चिखलदरा तालुक्यातील सर्व शाळांमध्ये चांगली सुरुवात झाली आहे, अशी चिखलदऱ्याचे गटशिक्षणाधिकारी मनोहर गायकवाड यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या इयत्ता १ ते ७ वी पर्यंतच्या संपूर्ण वर्गांना ही अध्यापन पध्दती लागू आहे.
२७ जून रोजी साद-संवाद कार्यक्रमात जि.प.प्राथमिक शाळा डोमीचे पाच विद्यार्थी, दोन पालक आणि दोन शिक्षक योगेश बोबडे, अनिल पडवाल तर मोझरीचे पाच विद्यार्थी, दोन पालक आणि तीन शिक्षक लक्ष्मण केंद्रे, उमेश आडे, अशोक बढे यांचा समावेश होता. दोन्ही शाळेच्या शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण पध्दतीचा अवलंब करुन शाळेची शंभर टक्के प्रगती साधली आहे.
या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीराम पानझडे, शिक्षक, अधिकारी, डोमी व मोझरी शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थींनी, विद्यार्थ्यांचे पालक व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Coconut Hughes with domi, Mozery students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.