‘त्या’ कोचिंग क्लासेसचे संचालक अनुदानित शाळेत सेवारत
By Admin | Updated: February 9, 2016 00:09 IST2016-02-09T00:09:25+5:302016-02-09T00:09:25+5:30
अनुदानित विद्यालयात शिकविणाऱ्या शिक्षकांना शिकवणी वर्ग घेण्याची अनुमती नसतानाही त्यांनी शिकवणी वर्ग घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले.

‘त्या’ कोचिंग क्लासेसचे संचालक अनुदानित शाळेत सेवारत
विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर : रिअल-एबल कोचिंग क्लासमधील प्रकार
अमरावती : अनुदानित विद्यालयात शिकविणाऱ्या शिक्षकांना शिकवणी वर्ग घेण्याची अनुमती नसतानाही त्यांनी शिकवणी वर्ग घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. हा धक्कादायक प्रकार सोमवारी राजापेठ परिसरातील रियल-एबल या शिकवणी वर्गाच्या इमारतीचे रेलिंग तुटून आठ विद्यार्थी पहिल्या माळ्यावरून खाली कोसळून जखमी झाल्यावर उघडकीस आला.
राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजापेठ स्पोर्टिंग क्लबनजीक शैलेंद्र सलुजा यांची इमारत आहे. त्यांच्या इमारतीमध्ये रियल-एबल टेस्ट सिरीजचे शिकवणी वर्ग आहेत. या शिकवणीवर्गांची जबाबदारी शिक्षक योगेश विरुळकर व अजय ठाकरे यांच्याकडे आहे. सोमवारी या शिकवणी वर्गातील आठ विद्यार्थी गॅलरीतील रेलिंगचे कठडे तुटल्याने पहिल्या माळ्यावरून खाली कोसळून जखमी झाले. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लोखंडी कठड्याखालील भागात टिनाचे शेड असल्यामुळे विद्यार्थी आधी टिनाच्या शेडवर आदळले आणि त्यानंतर ते खाली कोसळले. परिणामी गंभीर घटना टळली. मात्र, या घटनेमुळे खासगी शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच या शिकवणी वर्गात शिकविणारे शिक्षक हे शासन अनुदानित विद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवत असल्याची धक्कादायक माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे.
शिक्षकांची चौकशी सुरू
अमरावती : शिकवणीवर्ग घेणारे योगेश विरुळकर राजापेठ ठाण्याजवळ असणाऱ्या भारतीय बॉईज शाळेत शिकवत आहेत. अजय ठाकरे हे यवतमाळ येथील एका आश्रमशाळेवर शिकवत असल्याची माहिती आहे. या अनुषंगाने राजापेठ पोलिसांनी शिकवणी वर्ग घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील चौकशी सुरू आहे. त्यातच शिक्षणाधिकारी कार्यालया मार्फत याप्रकरणी चौकशी होणार असल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सी.आर. राठोड यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. याबाबत शिक्षक योगेश विरुळकर यांच्याशी वारंवार संपर्क केला असता होऊ शकला नाही. जिल्ह्यात ठिकठिकाणी खासगी शिकवणी घेण्यात येतात. मात्र, तेथे शिकविणारे शिक्षक हे अनुदानित शाळांमधील कर्मचारी आहेत का, याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे अशांवर नियंत्रण कोणाचे, असा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे रियल-एबल टेस्ट सिरीजमधील घटनेमुळे निदर्शनास आले आहे.