ढगाळ वातावरण, तापमान घटले
By Admin | Updated: May 4, 2015 00:28 IST2015-05-04T00:28:53+5:302015-05-04T00:28:53+5:30
काही दिवसांपूर्वी तापमान ४५ अंशांवर पोहोचले होते. आता आकाशात ढग जमा होत असल्याने तापमानात चढउतार ...

ढगाळ वातावरण, तापमान घटले
८ मे नंतर पावसाची शक्यता : उकाड्यापासून दिलासा
अमरावती : काही दिवसांपूर्वी तापमान ४५ अंशांवर पोहोचले होते. आता आकाशात ढग जमा होत असल्याने तापमानात चढउतार जाणवत आहे. त्यामुळे तापमानात २ अंशांनी घट झाली असून नागरिकांना उन्हाच्या तप्त झळांपासून थोडा दिलासा मिळाला आहे. ८ मे नंतर पुन्हा पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
उन्हाळा सुरु झाल्यापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सुरुवातीला वातावरणात थोडाफार गारवा निर्माण झाला होता. मार्च महिन्यात फारसा उन्हाचा प्रभाव जाणवला नाही. त्यातच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तापमानात चढउतार कायम होता. मात्र, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवसांत तापमान ४० ते ४४ डिग्री सेल्सिअसवर पोहोचल्याने उन्हाचा तडाखा जाणवला. आता मे महिन्याच्या सुरुवातीलाच ढग आणि उन्हाचा खेळ सुरु झाल्याने नागरिकांना तापमानापासून थोडा दिलासा मिळाला आहे. नेपाळमध्ये भूकंप झाला. त्यानंतर पावसानेही हजेरी लावली. तेथील हवामानाचा प्रभाव विदर्भातही जाणवत आहे. नेपाळमधील ढग वाऱ्याच्या दिशेने विदर्भाकडे आले आहेत. त्यामुळे विदर्भातही ऊन सावलीचा खेळ सुरू झाला आहे. मे महिन्यात तापमान ४२ ते ४५ डिग्री सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यातच ८ मे नंतर पावसाचे वातावरणसुध्दा निर्माण होण्याचे संकेत आहेत. मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या सुरुवातीला तापमान वाढण्याचे संकेत आहेत. मागील वर्षी मे व जून महिन्याचे तापमान ४४ ते ४७ डिग्रीपर्यंत पोहोचले होते. मात्र, यंदा तापमान मागील वर्षांपेक्षा कमी राहण्याचे संकेत आहेत. (प्रतिनिधी)
ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ-उतार सुरू आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा कमी तापमान राहण्याचे संकेत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस पावसाची शक्यता दिसून येत आहे.
- अनिल बंड,
हवामान तज्ज्ञ,