अमरावतीच्या शहापुरात ढगफुटीसदृश पाऊस; पुरात गेली महिला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2022 20:43 IST2022-08-29T20:42:46+5:302022-08-29T20:43:24+5:30
Amravati News शहापूर - दाभाडा या भागात सोमवारी दुपारी अचानक आलेला पाऊस ढगफुटीसारखा कोसळला. यामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे ३४ वर्षीय महिला वाहून गेली.

अमरावतीच्या शहापुरात ढगफुटीसदृश पाऊस; पुरात गेली महिला वाहून
अमरावती : शहापूर - दाभाडा या भागात सोमवारी दुपारी अचानक आलेला पाऊस ढगफुटीसारखा कोसळला. यामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे ३४ वर्षीय महिला वाहून गेली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला सायंकाळपर्यंत तिचा शोध घेण्यात अपयश आले. याचवेळी एका जवानाला काहीतरी चावल्याने ही शोधमोहीम थांबविण्यात आली.
संगीता मनदेव नागापुरे (३४) असे नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे. शहापूर येथील तीन महिला सोमवारी सकाळी दाभाडा शिवारातील शेतात कामाला गेल्या होत्या. या भागात दुपारी २ च्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. यामुळे दाभाडा - शहापूर मार्गातील नाल्याला पूर आला. पुरातून वाट काढत घराकडे जात असताना संगीता वाहून गेली असल्याचे तिच्यासमवेत असलेल्या इतर महिलांनी सांगितले.
याबाबत माहिती मिळताच तहसीलदार वैशाख वाहूरवाघ रांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधून चमूला पाचारण केले. दोन तास रेस्क्यू ऑपरेशन केल्यानंतर एकीकडे रात्री झाली, तर पथकप्रमुख सचिन धरमकर यांना काही तरी हाताला चावले. यामुळे त्यांना धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्राने सांगितले. रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळी तहसीलदार वैशाख वाहूरवाघ, मंडल अधिकारी देविदास उगले, तलाठी गोपाल नागरीकर, आर. जी. लाड, व्ही. आय. वानखडे यांनी सहभाग घेतला.