परीक्षा केंद्रात बॉलपेन, घड्याळी आणण्यावर बंदी
By Admin | Updated: November 16, 2015 00:16 IST2015-11-16T00:16:44+5:302015-11-16T00:16:44+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील प्राध्यापक पात्रता परीरक्षेसाठी (नेट) यापुढे उमेदवारांना स्वत:चे पेन, घड्याळ वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

परीक्षा केंद्रात बॉलपेन, घड्याळी आणण्यावर बंदी
नेट परीक्षा : पद्धतीत बदल, कडक नियमावली
प्रदीप भाकरे अमरावती
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील प्राध्यापक पात्रता परीरक्षेसाठी (नेट) यापुढे उमेदवारांना स्वत:चे पेन, घड्याळ वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. उमेदवारांनी परीक्षेपूर्वी अडीच तास परीक्षा केंद्रावर हजर राहणेही सीबीएसईने बंधनकारक केले आहे. येत्या २७ डिसेंबर रोजी ही परीक्षा होणार असून याच परीक्षेपासून ही नवीन नियमावली अंमलात आणली जाणार आहे.
स्वरुपात बदल
यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या या परिक्षेचे आयोजन करण्याची जबाबदारी आता सीबीएसईकडे सोपविण्यात आली आहे. परीक्षेचे पूर्वीचे दिर्घोत्तरी प्रश्नांचे स्वरुप बदलून सध्याही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे घेतली जात आहे. त्यापाठोपाठ परिक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांसाठी असलेल्या सूचनांमध्येही बदल झाला आहे. त्यातून आता गैरप्रकार रोखण्यासाठी हे प्रयत्न करण्यात आले आहेत.
सीबीएसईने दिलेल्या सूचनानुसार परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर अडीच तासांपूर्वी हजर राहणे आवश्यक आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना सकाळी ७ वाजता परीक्षा केंद्रावर हजर व्हावे लागेल. सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० या वेळेत ही परीक्षा होणार असून दरम्यानच्या काळात पेपर सोडविण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये दिल्या जाणाऱ्या बॉलपेनचा वापर करूनच परीक्षा द्यावी लागेल. तसेच परीक्षा केंद्रांतील भिंतीवर लावलेल्या घड्याळीच्या आधारावर वेळ पाळली जाणार असल्याने परीक्षार्थ्यांनी परीक्षेसाठी येताना घड्याळही सोबत आणू नयेत, अशा सूचना सीबीएसईने दिल्या आहेत.