बंद : १० नगरसेवकांसह १७ अटकेत

By Admin | Updated: May 15, 2016 23:56 IST2016-05-15T23:56:13+5:302016-05-15T23:56:13+5:30

महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या समर्थनार्थ बंद पुकारणाऱ्या १० नगरसेवकांसह १७ कार्यकर्त्यांना शहर कोतवाली पोलिसांनी अटक केली.

Closed: 17 detained with 10 corporators | बंद : १० नगरसेवकांसह १७ अटकेत

बंद : १० नगरसेवकांसह १७ अटकेत

कोतवाली पोलिसांची कारवाई : परवानगीविना आंदोलन, जामिनावर सुटका
अमरावती : महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या समर्थनार्थ बंद पुकारणाऱ्या १० नगरसेवकांसह १७ कार्यकर्त्यांना शहर कोतवाली पोलिसांनी अटक केली. रविवारी दुपारी त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्यानंतर वैयक्तीक जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला. सत्तापक्षातील नगरसेवकांसह अन्य कार्यकर्त्यांना अटक केल्याने रविवारी शहरातील वातावरण ढवळून निघाले. न्यायालय परिसरात अमरावतीकरांनी तोबा गर्दी केली.
बंद दरम्यान आयोजकांनी आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण न ठेवता व्यापाऱ्यांना वेठीस धरणे तसेच सावर्जनिक मालमत्तेची नासधूस केल्याचा ठपका पोलिसांकडून ठेवण्यात आला.
या पार्श्वभूमीवर रविवारी उशिरा रात्री नगरसेवकांसह कार्यकर्त्यांविरुध्द शहर कोतवाली पोलिसांनी गुन्हे नोंदविले. शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बंदला पाठिंबा देणाऱ्या टिपू सुलतान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात काही ठिकाणी धुडगूस घातला. गांधी चौकातील एका हॉटेलची पूर्ववैमनस्यातून तोडफोड करण्यात आली. बंदच्या आडून जुन्या घटनेचा वचपा काढण्यात आला.

रात्रीपासूनच अटकसत्र सुरू
अमरावती : बंद पुकारणाऱ्या बहुतेक नगरसेवकांचा या तोडफोडीशी संबंध नव्हता. मात्र, धुडगूस घालणाऱ्यांसह त्यांचे नेते बंदच्या व्यासपीठावर असल्याने पोलिसांनी नगरेसवकांना त्यासाठी दोषी धरले व अटकसत्र राबविले. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी ३२ कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविच्या कलम १४७, १४८, १४९, ५०६, ४२९, १०९ अन्वये गुन्हा नोंदविला.
शनिवारी उशिरा रात्री शहर कोतवाली पोलिसांनी आसिफ हुसेन, अब्दुल रफिक आणि अरुण जयस्वाल या तीन नगरसेवकांना अटक केली. रविवारी सकाळी पुन्हा अटकसत्र राबविण्यात आले. त्यामध्ये स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, काँग्रेसचे पक्षनेता बबलू शेखावत, दिनेश बूब, धीरज हिवसे, प्रदीप बाजड, इमरान अशरफी, हमीद शद्दा या नगरसेवकांसह युवासेनेचे राहुल माटोडे, अब्दुल नदिम, शाकाल तिवारी, विक्की चवरे, योगेश चवरे, विनय सिरसिया, विक्की घारू, आरिफ हुसैन यांना अटक करण्यात आली. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या अटक सत्रामुळे शहरात खळबळ उडाली. शहर कोतवाली ठाण्याच्या परिसरात राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती. अटक केलेल्यांना रविवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

यांना मिळाला जामीन
अविनाश मार्डीकर, दिनेश बुब, प्रदीप बाजड, धीरज हिवसे, बबलू शेखावत, राहुल माटोडे, शारदाप्रसाद तिवारी, विक्की चावरे, योगेश चावरे, विनय सिरसिया आणि विक्की घारू यांची बाजू प्रशांत देशपांडे, मोहित जैन, गणेश गंधे या वकिलत्रयीने मांडली तर नगरसेवक इम्रान अशरफी, हमीद शद्दा, आरिफ हुसैन आणि नदिम यांची बाजू शोएब खान यांनी मांडली. तसेच अनंत विघे व राजेश शर्मा या वकिलद्वयीने अनुुक्रमे अरुण जयस्वाल आणि अब्दुल रफीक यांच्यासाठी युक्तिवाद केला. १७ आरोपींचे कृत्य समाजविघातक नव्हते. जनतेचा आवाज शासनाकडे पोहोचविण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता, असा युक्तिवाद विधितज्ज्ञांकडून करण्यात आला.

यांना बनविले आरोपी
शहर कोतवाली पोलिसांनी अविनाश मार्डीकर, बबलू शेखावत, प्रदीप बाजड, हमीद शद्दा, आसिफ हुसेन, आरिफ हुसेन, इमरान अशरफी, अब्दुल रफिक ऊर्फ रफ्फू पत्रकार, धीरज हिवसे, अरुण जयस्वाल या नगरसेवकासह युवा स्वाभिमान संघटनेचे शहराध्यक्ष संजय हिंगासपुरे, हरिदास शिरसाट, विक्की घारू, सुनील भडके, विशाल वानखडे, पराग देशमुख, गणेश निंदाने, राज सारवान, विक्की चावरे, गुरु डेंडवाल, विजय सिरसिया, रोहण सिरसिया, अमित सिरसिया, अवी डेंडवाल, योगेश चावरे, राहुल सिरसिया, राहुल माटोडे, शेख नदिम शेख रफिक, गोलू साखा, मुन्ना तिवारी, श्याम पिंगळे यांच्यासह ३२ कार्यकर्त्यांना आरोपी बनविले आहे.

समाजहितार्थ आंदोलन, जामिनावर मुक्तता
महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करण्यासाठी लोकचळवळ उभारली गेली. जनतेचा तो आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या अशिलांनी बंद पुकारला. त्यात कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नव्हता, असा वास्तवदर्शी युक्तिवाद बचावपक्षाकडून करण्यात आला. तो ग्राह्य धरून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (६) वाय.डी. कोईनकर यांच्या न्यायालयाने १७ आरोपींना साडेसात हजाराच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.

व्यापारी प्रतिष्ठाने जबरीने बंद करण्यात आली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. या अनुषंगाने आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाच नगरसेवकांसह १८ जणांना अटक करून त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
-ज्ञानेश्वर कडू, पोलीस निरीक्षक, कोतवाली पोलीस ठाणे.

Web Title: Closed: 17 detained with 10 corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.