सेवानिवृत्ती वेतनासाठी लिपिकाची भटकंती
By Admin | Updated: June 3, 2015 00:27 IST2015-06-03T00:27:20+5:302015-06-03T00:27:20+5:30
कोठारा येथील शाळेतून मागील आठ महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कनिष्ठ लिपिकाला सेवानिवृत्तीचा आर्थिक लाभ ...

सेवानिवृत्ती वेतनासाठी लिपिकाची भटकंती
अन्याय : राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी
अचलपूर : कोठारा येथील शाळेतून मागील आठ महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कनिष्ठ लिपिकाला सेवानिवृत्तीचा आर्थिक लाभ नसून सेवानिवृत्त वेतनही सुरु झालेले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यांनी राष्ट्रपतींकडे स्वइच्छेने मरण्याची परवानगीही निवेदनाव्दारे मागितली आहे.
या प्रकरणास मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच सेवानिवृत्त सहायक शिक्षिकेचेही निवृत्ती प्रकरण अशाच प्रकारे रोखण्यात आलेले आहे. याबाबत मुख्याध्यापकांना निवृत्ती प्रकरण सादर करण्यासाठी वारंवार शिक्षणाधिकाऱ्यांनी सूचना देऊनही मुख्याध्यापक टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचे मे २०१५ चे वेतन थांबविण्यात येणार असल्याचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना दिले आहे.
दि लेप्रसी मिशन हायस्कूल येथे नेपाळ गोपाळराव कराळ हे कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. ते ३१ जुलै २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले. अद्यापही त्यांना सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने अनुज्ञेय आर्थिक लाभ मिळाला नसून सेवानिवृत्त वेतनही सुरु झालेले नाही. यासाठी त्यांनी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने दिली तरीही काहीच उपयोग झाला नाही. सेवानिवृत्ती प्रकरण मुख्याध्यापक देवीदास बाजीराव चवरे यांनी स्वत:कडे ठेवून घेतले आहे. ते अजूनही कार्यालयाकडे पाठविले नाही. याप्रकरणी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिवांनाही १९ मार्च २०१५ रोजी लेखी निवेदन पाठविले. राज्य मानवी हक्क आयोगाकडेही पत्र पाठविले होते. मात्र त्यावर योग्य कारवाई झाली नाही. महिनाभरापासून सेवानिवृत्ती संबंधी कुठलाही आर्थिक लाभ मिळाला नाही. (शहर प्रतिनिधी)