पालिकेत स्वच्छतेची निकड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:20 IST2018-05-22T22:20:57+5:302018-05-22T22:20:57+5:30
महापालिकेच्या विविध कार्यालयांमधील अडगळ, कागदपत्रांचे अस्ताव्यस्त गठ्ठे, विविध फायली, निरुपयोगी साहित्य तत्काळ हलवून आपआपली कार्यालये चकाचक करण्याचे आदेश आयुक्त हेमंत पवार यांनी दिलेत.

पालिकेत स्वच्छतेची निकड!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेच्या विविध कार्यालयांमधील अडगळ, कागदपत्रांचे अस्ताव्यस्त गठ्ठे, विविध फायली, निरुपयोगी साहित्य तत्काळ हलवून आपआपली कार्यालये चकाचक करण्याचे आदेश आयुक्त हेमंत पवार यांनी दिलेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी उपायुक्तांसह काल-परवा प्रशासकीय इमारतीमधील विभागांची पाहणी केली. त्या निरीक्षणानंतर विविध कार्यालयांतील अडगळ दूर करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. त्यांच्यावतीने उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी विभागप्रमुखांना तसे पत्र पाठविले आहे.
मागील सहा महिने महापालिका प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षणात चांगलीच आघाडी घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेला कुणी ‘...स्वत: कोरडे पाषाण’ म्हणू नये, याची आयुक्तांनी खबरदारी घेतली. बांधकाम विभागात साचलेली अडगळ दूर केली. मात्र, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी परवा पाहणी केली असता, खिडक्या, ग्रील, कोपरे अस्वच्छ दिसलेत. प्रशासकीय इमारतीच्या छतावरही त्यांना निरुपयोगी साहित्य आढळून आले. त्यासह अन्य ठिकाणी असलेले निरूपयोगी साहित्य राजापेठ कोठ्यावर हलविण्याचे आदेश त्यांनी दिलेत. पवार यांनी अडगळ दूर करण्याच्या सूचना दिल्यानंतर अनेक कार्यालयांमध्ये झाडाझडती सुरू झाल्याचे चित्र आहे. पालिकेतील कार्यालयाबरोबरच क्षेत्रीय कार्यालयांमध्येही स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे.
झीरो पेन्डन्सीला सुरुवात
राज्य सरकारने १५ फेब्रुवारीपासून झीरो पेन्डन्सीचे आदेश दिले असून, त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. कनिष्ठ लिपिक व संगणक परिचालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार पालिका अधिकाऱ्यांना वेळेत कामाचा निपटारा करण्याचे आदेश त्यांनी दिलेत.