नाल्यांच्या स्वच्छतेची धुरा अधिकाऱ्यांच्या शिरावर
By Admin | Updated: May 17, 2015 00:40 IST2015-05-17T00:40:44+5:302015-05-17T00:40:44+5:30
पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच शहरातील लहान-मोठ्या नाल्यांची सफाई ...

नाल्यांच्या स्वच्छतेची धुरा अधिकाऱ्यांच्या शिरावर
कर्तव्य निश्चित : गाळ काढताना नाल्याचे चित्रीकरण, तपासणीचे आदेश
अमरावती : पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच शहरातील लहान-मोठ्या नाल्यांची सफाई युद्धस्तरावर करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार १७ लहान तर १४ मोठे नाले सफाई करून येणाऱ्या परिस्थितीवर मात करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.
नाले-उपनाले पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करुन घेण्यासाठी महिनाभरापूर्वीच कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली हा आराखडा तयार करण्यात आला असून महापालिकेतील अभियंत्यांची चमू सफाई तपासणी अहवाल सादर करण्यासाठी सज्ज आहेत. काही नाल्यांची सफाई सुरू झाली आहे. यात वडाळी ते अंबा नाल्याचा प्रामुख्याने समावेश आहे. अमरावती-बडनेरा असे एकूण ३१ लहान-मोठे नाले आहेत. नाल्याच्या काठावर असलेल्या वस्त्यांना पावसाळ्यात संभावित धोका लक्षात घेत उपाययोजना करण्याचेदेखील ठरविण्यात आले आहे.
नाल्यांची वर्गवारी करीत अभियंत्यांना कर्तव्याचे आदेश बजाविले आहे. नाले सफाईचा कंत्राट ज्या एजंसीने घेतला त्या एजंसीने कामे केलीत की नाही हे तपासण्याची जबाबदारी उपायुक्त विनायक औगड, चंदन पाटील यांच्यासह सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, राहूल ओगले, सुषमा मकेश्वर, प्रणाली घोंगे यांच्यावर सोपविली आहे. या अधिकाऱ्यांच्या दिमतीला अभियंते व उपअभियंत्यांची चमू राहणार आहे. बांधकाम, सहायक संचालक नगर रचना विभाग व दलितवस्ती विकास विभागाचे अभियंत्यांची नाले सफाई तपासणी अहवाल सादरीकरणावर नियुक्ती करण्यात आली आहे.
नाले सफाई मोहिमेत कोणताही नाला सफाईपासून सुटता कामा नये याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिले आहेत. इनकॅमेरा स्वच्छतेचे चित्रीकरण होणार असल्याने यावर्षी नाले सफाई अपहार होण्याची शक्यता नगण्य आहे. नाले सफाई ही पारदर्शकपणे व्हावी यासाठी महापालिकेची चमू जोमाने कार्यरत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
१७ लहान, १४ मोठ्या नाल्यांची पुन्हा होणार सफाई
पावसाळ्यात उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता महापालिका प्रशासनाने नाले सफाईची मोहीम हाती घेतली आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी प्रमुख अधिकाऱ्यांसह अभियंत्यांवर नाले सफाईची जबाबदारी सोपविली आहे. या नाल्यांचे खोलीकरण करताना गाळ काढणे हे इनकॅमेरा केले जाणार आहे. यात १७ लहान तर १४ मोठ्या नाल्यांचा समावेश करण्यात आला आहे. नाले सफाईनंतर तपासणीचा अहवाल अधिकाऱ्यांना आयुक्तांकडे सादर करावा लागणार आहे. यापूर्वी काही नाल्यांची कागदावरच सफाई करून लाखो रूपयांची देयके काढली जात होती. याबाबतची तक्रार आयुक्त गुडेवार यांना प्राप्त झाली आहे. त्यामुळेच नाले सफाईवर अधिकाऱ्यांचे कर्तव्य निश्चित करण्यात आले आहे.
नाल्यांची वर्गवारी करीत अधिकारी, अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे नाले व्यवस्थित साफ झाले किंवा नाही, याचा तपासणी अहवाल पावसाळ्यापूर्वीच आयुक्तांकडे सादर करावा लागेल. नाल्यांच्या सफाईची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. बांधकाम विभागाचे अभियंते मदतीला आहेत.
- विनायक औगड, उपायुक्त, महापालिका.