स्वच्छ सर्वेक्षणात शहर २३१ व्या क्रमांकावर

By Admin | Updated: May 5, 2017 00:06 IST2017-05-05T00:06:50+5:302017-05-05T00:06:50+5:30

केंद्र सरकारने जानेवारी-फेब्रुवारीमध्ये केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण- २०१७ मध्ये अमरावती शहर २३१ व्या क्रमांकापर्यंत माघारले आहे.

In the clean survey, the city ranked 231 | स्वच्छ सर्वेक्षणात शहर २३१ व्या क्रमांकावर

स्वच्छ सर्वेक्षणात शहर २३१ व्या क्रमांकावर

लाजिरवाणे : २००० गुणांपैकी ९२२ गुण
अमरावती : केंद्र सरकारने जानेवारी-फेब्रुवारीमध्ये केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण- २०१७ मध्ये अमरावती शहर २३१ व्या क्रमांकापर्यंत माघारले आहे. केंद्रसरकारकडून गुरूवारी जाहीर करण्यात आलेल्या ४३४ स्वच्छ शहरांच्या यादीत राज्यातील ४४ शहरांचा समावेश आहे. त्यातही अमरावती शहर २८ क्रमांकांनी पिछाडीवर आहे. शहर स्वच्छतेसाठी अमरावती महापालिकेकडून वर्षाकाठी २५ ते ३० कोटी रूपये खर्च केले जातात, हे विशेष. शहराला केवळ ९२२ गुणांवर समाधान मानावे लागले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील ५०० शहरांमध्ये ४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी याकालावधीत क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०१७ राबविण्यात आले. त्यापैकी ४३४ स्वच्छ शहरांची यादी गुरूवारी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी घोषित केली अन् अपेक्षेप्रमाणे अमरावती शहर त्यात माघारले.
पहिल्या २०० स्वच्छ शहरांमध्येही अमरावती शहर येऊ शकले नाही. शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याच्या बाबीवर केंद्रानेही शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील स्वच्छ शहरे निवडण्यासाठी २ हजार गुणांचे स्वच्छ सर्वेक्षण घेण्यात आले. शहरामधील घनकचरा व्यवस्थापनाची नेमकी स्थिती त्यातून उघड झाली. महिनाभराच्या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले. यासर्वेक्षणात शहरातील स्वच्छताविषयक बाबींना केवळ ४६ टक्के गुण मिळाले आहेत.
क्यूसीआयने नेमलेल्या चारुदत्त पाठक, गोविंद घिमिरे आणि विजय जोशी या तीन सदस्यीय पथकाने १७ ते १९ जानेवारीदरम्यान अमरावती शहराची स्वच्छताविषयक पाहणी केली. घिमिरे आणि जोशी यांनी स्पॉट व्हिजिट तर पाठक यांनी स्वच्छता प्रकल्पाविषयीचे डॉक्युमेंटेशन पािहले. मात्र, जोशी आणि घिमिरे या उभय सदस्यांना औरंगाबादमध्ये लाच प्रकरणात ताब्यात घेण्यात आले होते. शैलेश बंजानिया या त्यांच्या प्रमुखाने तेथे १.७० लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. त्यामुळे ७ फेब्रुवारीला पुन्हा एकदा स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले. (प्रतिनिधी)

घनकचरा व्यवस्थापनावर भर
स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील ५०० शहरांमध्ये ४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०१७ राबविण्यात आले. २००० गुणांच्या या स्वच्छता विषयक स्पर्धेमध्ये शहरांचे गुणांकन ठरविण्यासाठी सुरत येथिल एका कंपनीने पुरविलेल्या ‘असेसर्स’ची मदत घेण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय, वाहतूक प्रक्रिया आणि घनकचऱ्याची विल्हेवाट या मुख्य तीन बाबींसह स्वच्छताविषयक अन्य बाबींची तपासणी करण्यात आली. यात स्थानिक नागरिकांकडून आलेल्या ‘फिडबॅक’साठीही ६०० गुण राखून ठेवण्यात आले होते.

 

Web Title: In the clean survey, the city ranked 231

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.