स्वच्छ अमरावतीला स्वास्थ्य अधीक्षकांचे ‘नख’
By Admin | Updated: January 14, 2017 00:07 IST2017-01-14T00:07:05+5:302017-01-14T00:07:05+5:30
केंद्र शासनाच्या २००० गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी महापालिका प्रशासन रात्रीचा दिवस करीत असताना ...

स्वच्छ अमरावतीला स्वास्थ्य अधीक्षकांचे ‘नख’
तिजारेंना ‘शो-कॉज’ : कंत्राटदारांचे हित जपण्याचा आरोप
अमरावती : केंद्र शासनाच्या २००० गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी महापालिका प्रशासन रात्रीचा दिवस करीत असताना स्वास्थ्य अधीक्षकाकडून ‘स्वच्छ अमरावती मिशन’ला नख लावण्याचा प्रकार होत आहे. स्वास्थ्य अधीक्षकाकडून महापालिकेचे नव्हे, तर साफसफाई कंत्राटदाराचे हित जोपासले जात असल्याचे निरीक्षण अतिरिक्त आयुक्तांनी नोंदविले आहे.
केंद्र शासनाची क्यूसीआय टीम ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१७’ अंतर्गत १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत स्वच्छ अमरावतीची तपासणी करणार आहे. २ हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात उत्तीर्ण होण्यासाठी आयुक्त हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांच्यासह दोन्ही उपायुक्त, पाच सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि स्वच्छता अधिकाऱ्यांनी गृहपाठ चालविला आहे. घनकचरा व्यवस्थापनासह कचरा संकलन, वाहतूक प्रक्रिया यासह दैनंदिन साफसफाई टार्गेट करण्यात आली आहे. यासंदर्भात उच्चाधिकारी बैठकांवर बैठकी घेत असून स्वच्छताविषयक कामे करण्याची जबाबदारी अधिनस्थ यंत्रणेवर आहे. वैयक्तिक शौचालयासह अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी यंत्रणेचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. स्वच्छ सर्वेक्षणात उत्तीर्ण होण्यात कोणतीच कसर राहू नये, म्हणून अख्खी यंत्रणा कामाला लागली असताना अरुण तिजारे नामक स्वास्थ्य अधीक्षकाने या मोहिमेला गालबोट लावण्याचा प्रकार केला आहे. याप्रकरणी तिजारेंना ‘शो कॉज’ नोटीस बजावण्यात आली आहे.शहरातील स्वच्छतेविषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ‘स्वच्छ अॅप’ तयार करण्यात आला. या अॅपवर आलेल्या तक्रारी विनाविलंब सोडवाव्यात, असे केंद्र आणि राज्य शासनाचे निर्देश आहेत. यंत्रणा यासमस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करीत असताना तिजारे यांनी ‘आपले सरकार’ या पोर्टलवरील २५ तक्रारी ३०० दिवस होऊनही निकाली काढण्याचे सौजन्य दाखविले नाही. याशिवाय ‘स्वच्छ अॅप’वर दाखल तक्रारी निकाली काढण्याकरिता कोणतेही प्रयत्न न केल्याचा ठपका ठेवला.
तिजारेंना सक्तीची रजा ?
महापालिकेचे आर्थिक हित न पाहता कंत्राटदाराचे किवा पुरवठाधारकांचे हित जोपासत असल्याने आपणाला सक्तीच्या रजेवर का पाठवू नये, अशी विचारणा अरूण तिजारे यांना दिलेल्या कारणे दाखवा नोटीसमधून करण्यात आली आहे.
सर्व प्रभागांत कचरा
कचरा संकलनासाठी शहरात अंदाजे ५५० ठिकाणी कंटेनर आहेत. स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने साफसफाईसाठी अधिकचे कामगार लावण्यात आलेत. मात्र, बहुतांश प्रभागांमध्ये कंटेनरच्या आसपास कचरा पसरलेला असतो. याचा अर्थ कचरा उचलला जात नसताना स्वास्थ्य अधीक्षक करतात तरी काय, असा प्रश्न अतिरिक्त आयुक्तांकडून उपस्थित करण्यात आला आहे.