‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ अभियान प्रारंभ
By Admin | Updated: September 29, 2014 00:33 IST2014-09-29T00:33:13+5:302014-09-29T00:33:13+5:30
भारत सरकारने २ आॅक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छ भारत स्वच्छ अभियान’ राबविण्याचे ठरविले आहे. या अभियानचा एक भाग म्हणून २५ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर दरम्यान

‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ अभियान प्रारंभ
गजानन मोहोड - अमरावती
भारत सरकारने २ आॅक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छ भारत स्वच्छ अभियान’ राबविण्याचे ठरविले आहे. या अभियानचा एक भाग म्हणून २५ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर दरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्याचे सूचित करण्यात आले आहे.
‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ या मोहिमेंतर्गत सर्व शाळांमधून स्वच्छतेविषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा सक्रिय व उत्स्फूर्त सहभाग आवश्यक असल्याचे मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्लीच्या अतिरिक्त सचिव वृंदा स्वरुप यांनी कळविले आहे. हा उपक्रम किंवा यापेक्षा वेगळे स्वच्छता व आरोग्यविषयक नाविन्यपूर्ण उपक्रमांची निवड करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचना आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक असल्याने आदर्श आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याविषयी शिक्षण विभागाला कळविण्यात आले आहे.
शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची भूमिका तसेच विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याची कायम जबाबदारी शासनाने घेतली आहे. शिक्षणामधून चांगल्या कलागुणांची जोपासना करण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना उत्साहवर्धक व आनंददायी वातावरण मिळाले तर त्यांची शाळेबाबतची गोडी अधिक प्रमाणात वाढतील. परिणामत: विद्यार्थिनींची उपस्थिती वाढेल, शालेय उपक्रमातील सहभाग व एकंदरीतच दर्जेदार शिक्षण यामध्ये सकारात्मक बदल होण्यास मदतच होईल, याच भूमिकेतून पंचप्रधानांचा विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादानंतर हे अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. याचा परिणाम चांगले होण्याची अपेक्षा आहे.